For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेश अ अंतिम फेरीत

06:52 AM Nov 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेश अ अंतिम फेरीत
Advertisement

भारत अ चा सुपर ओव्हरमध्ये पराभव

Advertisement

वृत्तसंस्था / डोहा

शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या अटितटीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात उभय संघांची कामगिरी दर्जेदार झाल्याने सामना टाय ठरला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये बांगलादेश अ संघाने भारत अ संघाचा पराभव करत आशिया चषक रायझिंग स्टार्स स्पर्धेची अंतिम फेरीत गाठली. सुपरओव्हरमध्ये दोन बळी टिपणाऱ्या बांगलादेश अ संघाच्या रिपॉन मोंडलला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

या सामन्यात भारत अ ने नाणेफेक जिंकून बांगलादेश अ संघाला प्रथम फलंदाजी दिली. त्यांनी 20 षटकात 6 बाद 194 धावा जमविल्या. त्यानंतर भारत अ संघाने 20 षटकात 6 बाद 194 धावा जमवित ही लढत टाय राखली. त्यानंतर पंचांनी सुपर ओव्हरचा अवलंब केला. सुपर ओव्हरमध्ये भारत अ चे पहिल्या दोन चेंडूवर दोन गडी बाद झाले. त्यानंतर बांगलादेश अ संघाने सुपर ओव्हरमधील पहिल्याच चेंडूवर सलामीचा फलंदाज यासीर अली झेलबाद झाला. त्यानंतर सुयश शर्माने दुसरा चेंडू व्हाईड टाकल्याने बांगलादेश अ संघाने एक बाद एक असा विजय मिळविला.

बांगलादेश अ संघाच्या डावामध्ये सलामीच्या हबीबुर रेहमान सोहनने 46 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांसह 65, जिशान आलमने 14 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांसह 26, झेवाद अब्रारने 19 चेंडूत 1 षटकारासह 13, मेहरोबने 18 चेंडूत 6 षटकार आणि 1 चौकारांसह जलद नाबाद 48 धावा झोडपल्या. कर्णधार अकबर अलीने 1 चौकारासह 9 धावा केल्या. अबु हैदरला खाते उघडताआले नाही. बांगलादेश अ संघाच्या डावामध्ये 15 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले. भारत अ तर्फे गुर्जपनीत सिंगने 2 तर हर्ष दुबे, सुयश शर्मा, रमनदीप सिंग, नमदन धिर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना भारत अ च्या डावाला वैभव सूर्यवंशी आणि आर्या यांनी दमदार सुरूवात करुन दिली. या जोडीने 22 चेंडूत 53 धावांची भागिदारी केली. सूर्यवंशीने केवळ 15 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह 38, आर्याने 23 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 44 धावा झोडपल्या. नमन धीर 7 धावांवर बाद झाला. कर्णधार जितेश शर्मा आणि वधेरा यांनी चैथ्या गड्यासाठी 52 धावांची भागिदारी केली. कर्णधार शर्माने 23 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारांसह 33, वधेराने 29 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 32 धावा झळकविल्या. रमनदीप सिंगने 3 चौकारांसह 17, आशुतोष शर्माने 1 षटकार आणि 1 चौकारासह 13 धावा जमविल्या. भारत अ संघाच्या डावामध्ये 11 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. बांगलादेश अ संघातर्फे अबु हैदर व रकिबुल हसन यांनी प्रत्येकी 2 तर रिपॉन मोंडल आणि सकलेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक: बांगलादेश अ 20 षटकात 6 बाद 194 (हबीबुर रेहमान सोहन 65, जिशान आलम 26, मेहरोब नाबाद 48, अब्रार 13, यासीर अली नाबाद 17, अवांतर 15, गुर्जपनीत सिंग 2-39, हर्ष दुबे, सुयश शर्मा, रमनदीप सिंग व नमन धीर प्रत्येकी 1 बळी). भारत अ 20 षटकात 6 बाद 194 (सूर्यवंशी 38, पी. आर्या 44, धीर 7, जितेश शर्मा 33, वधेरा नाबाद 32, रमनदीप सिंग 17, आशुतोष शर्मा 13, हर्ष दुबे नाबाद 3, अवांतर 7, अबु हैदर व रकिबुल हसन प्रत्येकी 2 बळी, रिपॉन मोंडल व सकलेन प्रत्येकी 1 बळी).

सुपर ओव्हर भारत 2 बाद 0, बांगलादेश 1 बाद 1.

Advertisement
Tags :

.