For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

29 जानेवारीपासून बेंगळूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

11:11 AM Dec 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
29 जानेवारीपासून बेंगळूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
Advertisement

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची माहिती : दिग्दर्शक, निर्माते प्रकाश राज यांची ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती

Advertisement

बेंगळूर : 17 वा बेंगळूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 29 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. विधानसौध समिती कक्षात 17 व्या बेंगळूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजन समितीसोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. ज्येष्ठ चित्रपट कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते प्रकाश राज यांची 17 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ब्रँड  अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसौधसमोर या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यंदाच्या चित्रपट महोत्सवात महिला सक्षमीकरणाबाबत थीम असणार आहे. राजाजीनगरमधील लुलू मॉल येथील सिने पोलिसांच्या 11 स्क्रीनवर महोत्सवातील चित्रपट दाखवले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बेंगळूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आशियाई, भारतीय आणि कन्नड चित्रपट स्पर्धा विभागांसाठी चित्रपट सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या तीन स्पर्धा विभागांसाठी आतापर्यंत 110 हून अधिक चित्रपट सादर करण्यात आले आहेत. चित्रपटांच्या स्पर्धा विभागांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 आहे. 17 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राजाजीनगरमधील लुलू मॉल तसेच डॉ. राजकुमार भवन, आर्टिस्ट असोसिएशन, चामराजपेठ आणि बनशंकरी येथील सुचित्रा फिल्म सोसायटी चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहे.

Advertisement

देश-विदेशातील चित्रपट सिनेमाप्रेमींसाठी उपलब्ध

जगभरातील प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांमध्ये सहभागी झालेले आणि विविध पुरस्कार आणि मान्यता मिळवलेले भारतातील आणि परदेश तील सर्वोत्तम चित्रपट 17 व्या बेंगळूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होत आहेत. कान्स (फ्रान्स), बर्लिन (जर्मनी), व्हेनिस (इटली), कार्लोवी व्हेरी (झेक प्रजासत्ताक), लोकार्नो (स्वित्झर्लंड), रॉटरडॅम (नेदरलँड्स), बुसान (दक्षिण कोरिया), टोरंटो (पॅनडा) येथील चित्रपट महोत्सवांमध्ये सहभागी झालेले आणि पुरस्कार आणि मान्यता मिळवलेले चित्रपट बेंगळूर चित्रपट महोत्सवात एकाच ठिकाणी पाहण्यासाठी सिनेमाप्रेमींना उपलब्ध असतील.

Advertisement
Tags :

.