बेंगळूर बॉम्बस्फोट प्रकरण सीसीबीकडे
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळूरच्या व्हाईटफिल्ड परिसरातील रामेश्वरम फॅफेमध्ये घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे शाखेकडे (सीसीबी) सोपविण्यात आला आहे. स्फोट प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसली तर चौघांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. या घटनेमागे दहशतवाद्यांचा हात आहे का, यासह सर्व बाबींचा तपास केला जात आहे.
दुपारी जेवणासाठी रामेश्वरम कॅफेमध्ये गर्दी असल्याने हीच वेळ निवडून संशयित आरोपीने स्फोटके असणारी बॅग ठेवली होती. स्फोटासाठी टायमरचा वापर केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. स्फोटामध्ये 9 जण जखमी झाले होते. संशयित आरोपी बेंगळूर शहर परिवहन महामंडळाच्या वोल्व्हो बसने कॅफेमध्ये आला. नाश्ता केल्यानंतर बॅग ठेवून त्याने तेथून पोबारा केला. त्यानंतर काही क्षणातच बॉम्बस्फोट झाला. 10 सेकंदाच्या अंतराने दोन स्फोट झाले. एकाच वेळी हे स्फोट घडले असते तर मोठा अनर्थ घडला असता असे फॉरेन्सिक लॅबच्या तज्ञांनी सांगितले आहे.
चौघांची अज्ञात स्थळी चौकशी
दरम्यान, पोलिसांनी संशयास्पद वावरणाऱ्या व्यक्तीसह चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यांची अज्ञात स्थळी चौकशी केली जात आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीने डोक्यावर टोपी आणि चेहऱ्याला मास्क लावल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी दुपारी 11:50 ला तो कॅफेतून बाहेर आला. काही अंतर चालत जाऊन त्याने पुन्हा बसने पुढील प्रवास केल्याचे सांगण्यात आले. स्फोटप्रकरणी एचएएल पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आयपीसीच्या सेक्शन 307, 471 आणि युएपीए कायद्याच्या सेक्शन 16, 18 आणि इतर कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्रमुख भागात सतर्कता
रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्बस्फोट घडविण्यात आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. बेंगळूर शहरातील बसस्थानके, रेल्वेस्थानकांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राज्यातील प्रमुख ठिकाणी देखील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वेस्थानकांवर संशयास्पद वस्तू आढळल्यास त्वरित माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
बॉम्बस्फोट प्रकरणामागील संपूर्ण सत्य बाहेर आले पाहिजे. तंत्रज्ञानाचा परिणामकारक पद्धतीने वापर करून तपास करा. अधिक वर्दळ असणाऱ्या भागात पोलीस गस्त वाढवावी, अशा सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. रामेश्वरम कॅफेमधील बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास गतीमान करण्यासंबंधी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी बेंगळुरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेने तत्परतेने काम केले पाहिजे. सोशल मीडियावरील खोट्या वृत्तांना चाप लावावा. समाजाची दिशाभूल करणाऱ्यांवर कोणतीही सहानुभूती न दाखविता कारवाई करावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
एनआयएमार्फत चौकशीची भाजपची मागणी
बेंगळूरच्या कॅफेमधील बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवावा, अशी मागणी राज्य भाजप नेत्यांनी केली आहे. शुक्रवारी घडविण्यात आलेला स्फोट हा साखळी बॉम्बस्फोटाची तालिम असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते सी. टी. रवी यांनी दिली आहे. माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी सरकारने बॉम्बस्फोट प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, एनआयएमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
संशयित प्रशिक्षित?
कॅफेमध्ये स्फोटक साहित्य ठेवलेल्या संशयिताने टोपी आणि मास्क परिधान केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. अगदी नियोजनबद्ध पद्धतीने त्याने हे कृत्य केले आहे. पोलिसांच्या हाती पुरावे लागू नयेत यासाठी त्याने हॅन्ड ग्लोव्हजचाही वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून संशयिताने बाजारपेठेत उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालाचा वापर करून बॉम्ब तयार करण्याचे आणि स्फोट घडविण्याचे प्रशिक्षण घेतले असावे, असा संशय पोलिसांना आहे.