Hatkanangale News | शारीरिक व्यंगावर मात करणाऱ्या 'बंडू'च्या जिद्दीला फुटले पंख; महावीर समूहाकडून 'ई-सायकल' भेट
किणीतील दिव्यांग अविनाश पाटील यांना स्वयंरोजगारासाठी ई-सायकलची मदत
घुणकी (शांतीनाथ पाटील.) - घुणकी दि. 16.किणी येथील दिव्यांग बांधव अविनाश अजित पाटील उर्फ बंडू या जिद्दी दिव्यांग बांधवास स्वयंरोजगारास मदत व्हावी म्हणून श्री महावीर संस्था समूहाच्या अंतर्मना सामाजिक कृतज्ञता निधी तुन ई सायकल साठी आर्थिक मदत करून त्यास बळ देण्याचा कौतुकास्पद प्रयत्न करण्यात आला.
किणी. ता हातकणंगले येथील अविनाश अजित पाटील बंडू उर्फ यांस दुर्दैवाने जन्मताच दुर्दैवाने 60% अपंगत्व आहे. दुसऱ्याच्या मदतीशिवाय हलता ही येत नाही अशा परिस्थितीला ही हार न मानता बंडू ने हेल्पर्स हॅंडीकॅप संस्थेच्या गडमुडशिंगी येथील शिक्षण संस्थेतून वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे. शासकीय दिव्यांग कोट्यातून नोकरीसाठी ही प्रयत्न केला मात्र अपंगत्वाची टक्केवारी जास्त असल्याने शासकीय नोकरीचा लाभ मिळू शकला नाही.
यातच दुर्दैवाचा फेरा गडद होत गेला आई-वडिलांचेही कृपा छत्र हरवले. पण बंडूने शारीरिक व्यंगत्व आई-वडिलांचा हरवलेला आधार अशा बिकट परिस्थितीतही चुलते चुलती च्या मदतीने धडधाकट युवकांनाही लाजवेल असा जगण्याच्या लढाईतला संघर्ष तो ही स्वतःच्या जिद्दीवर व हिमतीवर करण्याची जिगर ठेवलेला बंडू तीन चाकी सायकलचे हाताने हँडल मारत प्रत्येक शनिवारी ग्रामदैवत हनुमान मंदिर समोर तर सोमवार महादेव मंदिर गणपती मंदिर समोर नारळ. हार.अगरबत्ती.कापूर. विकून तर टोल नाक्यावर अगरबत्ती विक्री करून आपला उदरनिर्वाह चालवण्याचा प्रयत्न करणारा बंडू यास हाताने तीन चाकी सायकल मारतानाचा त्रास पाहून श्री महावीर संस्था समूहाच्या एड एन आर पाटील यांनी बंडू यास तीन चाकी ई सायकल देण्याचा संकल्प संस्थांच्या पदाधिकाऱ्यासमोर मांडला व महावीर संस्था समूह व शतायुषी ज्येष्ठ नागरिक संघटना यांचे माध्यमातून अंतर्मना सामाजिक कृतज्ञता निधी संकलित केला जातो.
या निधीतून बंडू यास ई सायकल देण्याचा निर्णय घेण्यात आला व तो तडीस ही नेला. संस्थेचे चावरे शाखा सल्लागार विक्रम सिंह पाटील यांच्या हस्ते दिव्यांग बांधव बंडू यास ई सायकल साठी आर्थिक सहाय्य करून ई सायकल सुपूर्दही केली. यावेळी महावीर संस्था समूहाचे ऍड एन आर पाटील. शतायुषी ज्येष्ठ नागरिक संघटना व महावीर संस्था समूहाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दिव्यांग बांधवांच्या जिद्दीला बळ देण्याचे श्री महावीर संस्था समूहाचे कार्याचे परिसरातून कौतुक ## अंतर्मना सामाजिक कृतज्ञता निधी. महावीर संस्था समूह श्री महावीर संस्था समूह व शतायुष ज्येष्ठ नागरिक संघटना यांचे माध्यमातून वाढदिवस. निवड. किंवा अभिनंदननाचा प्रसंग असेल तेव्हा हार तुरे. शाल श्रीफळ ऐवजी ती रक्कम अंतर्मना सामाजिक कृतज्ञता निधी स देण्याची संकल्पना ऍड एन आर पाटील यांनी मांडली त्यास सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत आज या निधीने लाखाचा टप्पा ओलांडला आहे.
या रकमेतून व मिळणाऱ्या व्याजातून समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदत. तसेच गरजू घटकांना मदत करण्याचा पांयडा या निधीतून होत आहे. हार तुरे शाल श्रीफळ याचा व्यर्थ जाणारा खर्च एखाद्या गरजूला मदत देऊन त्याला उभारी देण्याची संकल्पना व त्यास मिळणारा प्रतिसाद कौतुकास्पद आहे.