बंडू कोळी राष्ट्रपती सुवर्णपदकाचे मानकरी
कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाचा 61 वा दीक्षांत समारंभ शुक्रवार, 17 रोजी सकाळी 11 वाजता राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा संचालक डॉ. आशिष लेले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठातील राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात होणाऱ्या दीक्षांत समारंभात बंडू कोळी याला राष्ट्रपती सुवर्णपदक तर नोरोन्हा क्रिशा अल्दाला कुलपती सुवर्णपदक जाहीर करण्यात आले आहे. यंदा 22 हजार 897 मुलांना तर 28 हजार 595 मुलींना पदवी प्रमाणपत्राचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी दिली.
यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. अशिष लेले यांना शांतीस्वरूप भटनागर अॅवॉर्ड मिळाला आहे. त्यांनी युएसएमध्ये पीएच. डी. पदवी घेतली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी पीएच. डी. पदवी पूर्ण केली आहे. त्यांना यंग सायन्टिस्ट अॅवॉर्ड मिळाला आहे. फेलो इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमीचा अॅवॉर्ड मिळाला आहे. इन्फोसेस प्राईज इन इंजिनिअरिंग अॅन्ड कॉप्युटर सायन्स, जी. आय. काने गोल्ड मेडल असे अनेक अॅवॉर्ड मिळाले आहेत. त्यांनी संशोधनासह औद्योगिक क्षेत्रातही काम केले आहे.
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव म्हणाले, यंदा 51 हजार 492 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यामध्ये 14 हजार 239 विद्यार्थी प्रत्यक्ष तर 37 हजार 223 पोस्टाने पदवी प्रमाण स्वीकारणार आहेत. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र पदवी प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी स्टॉल उभारले आहेत. विद्यार्थ्यांना कोणत्या स्टॉलवर पदवी प्रमाणपत्र मिळणार याची माहिती एसएमएसद्वारे मिळणार आहे. तसेच 16 स्नातकांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. 38 स्नातकांना प्रत्यक्ष पाहुण्यांच्या हस्ते पीएच. डी. पदवी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. दीक्षांत समारंभात पहिल्यांदाच इंग्रजी व मराठी भाषेत द्विभाषिक पदवी प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. स्वायत्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संयुक्त पदवी प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. सर्व पदवी प्रमाणपत्रांची तपासणी करून चुका राहणार नाहीत याची काळजी घेतली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर क्यूआर कोड असणार आहे. त्यामुळे कोठेही पदवी प्रमाणपत्र पडताळणी करण्यास सोपे जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर पीआरएन नंबर, आधारकार्ड नंबर आणि एबीसी नंबर असणार आहे. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अलोक जत्राटकर, ग्रंथालय संचालक डॉ. डी. बी. सुतार, आदी उपस्थित होते.