वांद्रे-मडगाव सिंधू एक्स्प्रेस आजपासून धावणार
आठवड्यातून दोन दिवस प्रवास
मडगाव : रेल्वे मंडळाने मुंबईतून गोव्याला जाणाऱ्या नव्या मार्गावरील नव्या एक्सप्रेस ट्रेनला हिरवा कंदील दाखवला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे, बोरिवलीवरून नवीन सिंधू एक्स्प्रेस मडगावपर्यंत धावणार आहे. सिंधू एक्स्प्रेसला आज म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी वांद्रे ऐवजी बोरिवली रेल्वे स्थानकावरून हिरवा बावटा दाखवला जाईल, अशी माहिती रेल्वे मंडळाने दिली आहे.
वांद्रे-मडगाव सिंधू एक्सप्रेस आठवड्यातून दोन दिवस धावेल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात तसेच गोव्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नव्या ट्रेनचा लाभ होणार आहे. सिंधू एक्सप्रेसचे वेळापत्रक पुढील प्रमाणे : वांद्रे टर्मिनल-मडगाव (बुधवार आणि शुक्रवार) गाडी क्रमांक : 10115 वांद्रे टर्मिनल वरून सकाळी 6.60 वाजता सुटणार, मडगाव स्थानकावर रात्री 10 वा. पोहोचणार.
मडगाव-वांद्रे टर्मिनल (मंगळवार आणि गुरूवार) गाडी क्रमांक 10116, मडगाव स्थानकावरून सकाळी 7.40 सुटणार, वांद्रे टर्मिनलवर रात्री 11.40 वा. पोहोचणार. या रेलगाड्या वांद्रे, बोरिवली, वसई रोड, भिंवडी रोड, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदूर्ग, सावंतवाडी, थिवी, करमळी आणि मडगाव असे थांबे घेणार आहेत. शभारंभी टेन वांद्रे ऐवजी बोरिवली येथून धावणार आहे. प्रवाशांनी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून बुकिंग करावे. या प्रवासासाठी 400 ते 500 रूपयेपर्यंत प्रवाशांना मोजावे लागतील.