उत्तर गोवा जिल्हा पंचायतीसाठी बांदोडकर, च्यारी यांचे अर्ज सादर
दोनच अर्ज आल्याने निवडी बिनविरोध
पणजी : भारतीय जनता पक्षातर्फे उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी रेईश मागूस मतदारसंघाच्या सदस्य रेश्मा संदीप बांदोडकर तर उपाध्यक्षपदासाठी होंडा मतदारसंघाचे नामदेव बाबल च्यारी यांनी अर्ज सादर केले आहेत. काल, सोमवारी बांदोडकर आणि च्यारी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी रविवारी संध्याकाळी दक्षिण आणि उत्तर गोवा जिल्हा पंचायत मतदारसंघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या नावाची अधिकृत घोषणा केली होती. त्याच अनुषंगाने बांदोडकर आणि च्यारी यांनी उत्तरेतून अर्ज भरले. 20 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत भाजपने उत्तर गोव्यात 18 आणि दक्षिण गोव्यात 11 जागा मिळविल्या आहेत. उत्तर गोव्यातील अध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे. दक्षिण गोव्यात मगो पक्षाने बिनशर्त पाठिंबा दिल्याने भाजपची दावेदारी अधिक भक्कम झाली. मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पाठिंब्याचे पत्र सादर केल्याने या निवडीचा मार्ग मोकळा झाला.