बंधविमोचन राम
बंधविमोचन राम माझा बंधविमोचन राम
सकलही ऋषीमुनी भजती जयासी
शरणागत सुखधाम
खास कीर्तनात ऐकायला मिळणारा पूजनीय वेणास्वामी रचित हा अभंग. ‘धन्य ते गायनी कळा’ असं ज्या समर्थ रामदासांनी म्हणून ठेवलंय त्यांच्या परम शिष्या वेणाबाई यांची ही रचना. वेणास्वामींना महाराष्ट्रातल्या आद्य स्त्राr कीर्तनकार असं म्हणणं योग्य ठरेल. याच वेणास्वामींना त्यांच्या बालपणीच वैधव्य आलं होतं आणि त्यांनी समर्थांची दीक्षा घेतली. तत्कालीन समाजरुढीच्या बळी ठरलेल्या आणि सर्व नातेवाईक असूनही अनाथ झालेल्या या विधवा बालिकेला समर्थांनी रामाच्या चरणांचा मार्ग दाखवून दिला होता. पण घरच्यांनी खोट्या प्रतिष्ठेपायी वेणाबाईला विष दिलं. ज्या वेळेला तिचं प्राणपाखरू त्या देहातून उडून लांब चाललं होतं. हीच आपली शेवटची घटका आहे असं त्या मुलीला कळून चुकलं होतं. कदाचित त्याचवेळेला बंधविमोचन म्हणजे काय ते तिला कळलं असेल. ज्या वेळेला समर्थ आले आणि त्यांनी त्या विषबाधेतून तिला बाहेर काढलं त्याच वेळेला तिच्या सर्व वेणा कायमच्या शांत झाल्या आणि ती वेण्णा नदीसारखी अथांग झाली एवढं खरं.
सद्गुरूंचे भेटीसाठी
पडाव्या जिवलगांशी तुटी
सर्वस्व अर्पावे शेवटी
प्राण तोही वेचावा
या समर्थांच्याच पंक्तींचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या वेणाबाई ज्या वेळेला माझा राम बंधविमोचन आहे असं सांगतात त्यावेळेला चित्तात अति हळुवारपणा आणून ते ऐकावं असं वाटतं. तत्कालीन उच्चकुलीन स्त्रियांप्रमाणेच संगीताचा गंधही न घेतलेल्या वेणाबाई ज्या वेळेला कीर्तन करू लागल्या त्या वेळेला त्यांच्या रसाळ वाणीसोबतच त्यांच्या मधुर कंठातून जे दिव्य संगीत त्या वेळेला बाहेर पडत असेल त्याने ऐकणाऱ्याचं भान नक्की हरपत असेल. ब्रम्हांडात भरून असलेले सूर कंठात का नसतील? पण आपल्या कंठात सूर आहेत आणि त्या सुरांची स्थानं नक्की कुठे आहेत याचा शोध ज्याला लागतो तो गायक कलाकार होतो. मग काहीजण रियाजाने होतात. आणि संत मात्र अपार भक्तीने होतात. त्यांचा देह म्हणजे परमेश्वरप्राप्तीचं एक साधन होऊन जात असल्यामुळे ते साधन हवं तसं वापरू शकतात. म्हणून कीर्तनाला उभं राहतेवेळी त्या देहाचं आपोआप एखाद्या सुरेल वाद्यामध्ये रूपांतर होत असावं.
ज्या रामावर असंख्य गीतं रचली गेली आहेत, ती गीतं असंख्य कार्यक्रमांमधून असंख्य वेळेला गायली जातात. त्या रामरायाच्या आयुष्यात मात्र संगीत हा विषय कितीसा राहिला होता हे खरोखर त्याचा तोच जाणे. एरवी आपल्याला रामावरती अत्यंत मधुर गाणी ऐकायला मिळतात. महाराष्ट्रासाठी म्हणायचं झालं तर गीतरामायण हा त्याचा सर्वोच्च आविष्कार आहे. या व्यतिरिक्त पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर या दोन महान कलाकारांनी मिळून केलेला ‘राम शाम गुणगान’ हा अल्बम आहे, सूर्यगायत्रीने गायलेलं मूळ लता मंगेशकर यांचं ‘श्रीरामचंद्र कृपालु भज मन’ हे गीत असेल, संजीव अभ्यंकर यांनी गायलेलं ‘ध्यान लागले रामाचे’ आहे या व्यतिरिक्तही अक्षरश: हजारो गाणी त्या रामावर झालेली असतील. रामावरचं वास्तवदर्शी गीत म्हणजे पी. सावळाराम रचित आणि लतादीदींनीच गायलेलं ‘रामा हृदयी राम नाही’ हे गीत! अत्यंत आर्त असणारं हे गीत ऐकताना डोळ्यातलं पाणी खळतच नाही. सीतापरित्याग हा रामायणातील एक हृदयद्रावक प्रसंग! मूळ वाल्मिकी रामायणामध्ये हा नाही असं तज्ञांचं मत आहे. परंतु नंतर रामायणामध्ये आलेली ही कथा म्हणजे एवढी गुणी पवित्र स्त्राr आपली पत्नी असतानाही केवळ लोकापवादासाठी रामाने तिचा त्याग केला याबद्दल आजही लोकं रामाला असंख्य दूषणं देत असतात. हेच लोक दुसऱ्या तोंडाने असेही म्हणत असतात की नवरा बायकोच्या मध्ये प्रत्यक्ष ब्रह्मदेवानेही पडू नये. मग या नवरा बायकोच्या मध्ये आपण सगळे का पडायला जातो ते देवच जाणे. एकदा राजा म्हटला की त्याने उपभोगशून्य स्वामी असलं पाहिजे अशी अतिशय प्राचीन परंपरा आहे. ही परंपरा रघुकुलापासूनच सुरू झालेली असावी हे तर्कसंगत वाटतं. कारण केवळ आपल्या सावत्र आईने आज्ञा केली म्हणून एका क्षणाचाही विचार न करता रामराया वनवासाला जाणं स्वमर्जीने निवडतात. त्याचे बरे वाईट सर्व परिणाम अत्यंत शांतपणे बघतात. त्या वेळेला ते परावलंबित्व दाखवत नाहीत तर त्यांना एवढंच म्हणायचं असतं की एकदा माणसाच्या जन्माला आलो की त्या जन्मात येणारे सगळे भोग हे माणसाला भोगूनच संपवावे लागतात. म्हणजे ते निक्रिय आहेत का? तर अजिबात नाही. दक्षिणेकडच्या वनचर राज्यांमध्ये एक पूर्ण संस्कृती स्थापन करण्याचं खूप मोठं कार्य या रामाने केलेलं आहे. रामराया आणि सीतामाई या कुटुंबाने अयोध्येपासून ते थेट लंकेपर्यंतचा जो प्रवास केला ती आठ ते दहा ठिकाणं, जिथे त्यांनी वास्तव्य केलं होतं ती गावं आजही देशाच्या नकाशावर आहेत. ती दाखवता येतात. तिथे त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा आजही संशोधकांना सापडत आहेत.
राम म्हणजे त्यागमूर्ती! राम ही व्यक्तिरेखा वागणुकीने अतिशय सौम्य आहे. परंतु भारतातल्या सर्व राम मंदिरांमध्ये राम हा कोदंडधारी दाखवलेला आहे. राम ही देवता शस्त्रसज्ज आहे. याचाच अर्थ राम ही शौर्याची आणि क्षात्रतेजाचीही देवता आहे. झाडापेडांना आणि प्राणी पक्षांना तुम्ही माझ्या सीतेला कुठे पाहिलंत का? असे विचारणारा राम, दगडांना आणि जुन्या वृक्षांना मिठी मारून रडणारा राम म्हणजेच केवळ राम नाही. आणि ते रडणं म्हणजे नेभळटपणा तर नव्हेच नव्हे. ते आपल्या पत्नीवरचं नितांत प्रेम आहे. इतकी शूर असणारी व्यक्ती ‘कापविन तिन्ही लोक बले’ असं म्हणणारी व्यक्ती पत्नीच्या विरहाने वेडीपिशी होणं साहजिक आहे. कारण एकपत्नीव्रती असणाऱ्या त्याच्या हृदयाजवळचं सीतेइतकं कोणीच नाही. आत्यंतिक प्रेमातून आलेला तो आक्रोश आहे. व तो रडत तिथेच थांबत नाही तर जटायूचा उद्धार करून वनचर राजाची मदत घेण्याच्या निमित्ताने त्यांची उत्तम, भक्कम संस्कृती स्थापित करून त्यांच्याकडून काही जीवनमूल्य शिकून लंकेपर्यंत पोहोचला. तिथं गेल्यानंतर रावणाशी नीतिमत्तेने युद्ध करून आपल्या पत्नीला सोडवून त्याने माघारी अयोध्येत आणलं. केवळ लोकांचं समाधान व्हावं यासाठी त्यांनी तिला अग्नीपरीक्षा द्यायला लावली. यातून त्याला खरं पाहता सीतेवर अन्याय करायचा नसावा. उलट जसा मी लोकांना बांधील आहे तशी महाराणी म्हणून माझी पत्नी देखील लोकांना उत्तर द्यायला बांधील आहे एवढंच रामरायाला दाखवून द्यायचं असावं. अतिशय विशाल हृदय असलेल्या रामरायाच्या नशिबी आपल्या प्रियजनांचा कायमचा विरह लिहिलेला होता. परंतु सुखदु:खं समेकृत्त्वा या वचनाचे मूर्तिमंत रूप असणाऱ्या रामाने कधी त्याचा खेद किंवा खंत केली नाही. त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणतात. म्हणजेच मर्यादेचं पालन करण्याच्या बाबतीत रामराया हा मापदंड आहे. त्यांच्याइतकी मर्यादा त्यानंतर कधीही कोणीही पाळू शकले नाही. आपल्या मातेचा आदेश म्हणून वनवासात जातानाही त्यांनी कुरकुर केली नाही. स्वत:च्या लहान भावंडांची योग्य ती समजूत त्यांनी काढली. त्यांना आपापल्या जबाबदाऱ्यांचे पालन करण्यासाठी सुचवलं. आपल्या पत्नीवर अपरिमित असीम प्रेम केलं. आपल्या कुटुंबाचं, त्याहून जास्त म्हणजे आपल्या राज्यातील जनतेचं अखेरपर्यंत हितच पाहिलं. आयुष्यभर ते कार्यमग्न राहिले.सीतापरित्याग केल्यापासून रामानेही राजाचे देहभोग संपूर्णतया वर्ज्य करून एक प्रकारे संन्यासच पत्करला होता. म्हणून ज्याच्या आयुष्यात रूढ अर्थाने कधी संगीताचा आनंद घेणं आलंच नसेल, त्या रामरायावर हजारो गीतं रचून गेली हजारो वर्ष लाखो लोक ती गातात, ऐकतात व मनोभावे रामरायाला भजतात. गाण्याच्या क्षेत्रातलं इतकं विपरीत उदाहरण आपल्याला अन्यत्र कुठे बरं आढळावं?
-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु