ज्येष्ठ नागरिक विचार मंचाच्या निवडणुकीत श्री देव बांदेश्वर आघाडीचे निर्विवाद वर्चस्व
बांदा ग्रामपंचायतीच्या सभागृहात सकाळी 8 ते दुपारी 12.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 292 मतदारांपैकी 186 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी 63 टक्के इतकी राहिली. मतदानानंतर सायंकाळी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला.
पुरुषांच्या नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत श्री देव बांदेश्वर आघाडीचे महादेव बांदेकर (141), हरिश्चंद्र भिसे (143), उत्तम देसाई (141), भिकाजी धुरी (136), हनुमंत मालवणकर (144), गुरुनाथ नार्वेकर (154), जगन्नाथ सातोस्कर (154), प्रकाश शिर्के (142) आणि महादेव वसकर (141) यांनी विजय मिळवला. अपक्ष उमेदवारांमध्ये महादेव सावंत यांना 59, सुकाजी गावडे यांना 45, तर अशोक परब यांना 33 मते मिळाली.
महिला राखीव गटात निकिता मोरजकर यांनी 155, तर अर्चना सावंत यांनी 149 मते मिळवून विजय संपादन केला. अपक्ष उमेदवार अनुराधा मोर्ये यांना 33 मते मिळाली. मतमोजणीदरम्यान सर्वसाधारण गटातील 17, तर महिला गटातील 12 मते बाद ठरली.
आघाडीच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळवल्याने ज्येष्ठ नागरिक विचार मंचाच्या आगामी कार्यकारिणीत श्री देव बांदेश्वर आघाडीचे वर्चस्व राहणार आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पृथ्वीराज बांदेकर यांनी काम पाहिले.
