गोव्यातील डंपर कारवाईचे बांद्यात पडसाद; ट्रान्सपोर्ट व्यावसायिक व चालकांत हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडाळ एमआयडीसी येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक उमेश अनंत दळवी (37) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, डंपर अडविल्याच्या कारणावरून अनिकेत बांदिवडेकर (26, रा. निरवडे, सावंतवाडी) व त्याच्या अन्य पाच मित्रांनी दळवी यांना अश्लील शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी देत अनिकेत याने लोखंडी पाईपने दळवी यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूस वार करून गंभीर दुखापत केल्याचा आरोप आहे. या तक्रारीवरून अनिकेत व त्याच्या पाच साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, डंपर चालक अनिकेत बांदिवडेकर यांनीही परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे. गोव्यात डंपरवर झालेल्या कारवाईबाबत कोणाच्या सांगण्यावरून कारवाई झाली, याची विचारपूस करत असताना उमेश दळवी यांनी आपण कुडाळ असोसिएशनचे सदस्य असल्याचे सांगत तेथे थांबण्यास विरोध केला व शिवीगाळ केली. त्यानंतर दळवी यांनी गाडीतील लोखंडी पाईपने मारहाण केल्याचा आरोप अनिकेत यांनी केला आहे. तसेच नितीन शिरसाठ व ओमकार वालावलकर (दोघेही रा. कुडाळ) यांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
या तक्रारीवरून उमेश दळवी, नितीन शिरसाठ आणि ओमकार वालावलकर या तिघांविरोधात बांदा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. बांदा शहरात पहाटे घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली असून, दोन्ही परस्परविरोधी गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नाईक करीत आहेत.
