महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

उचगाव मळेकरणी परिसरात यात्रा करण्यावर बंदी

11:41 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ग्राम पंचायतीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय : बकऱ्यांचा बळी देण्याच्या प्रथेला निर्बंध

Advertisement

वार्ताहर /उचगाव

Advertisement

मळेकरणी देवस्थान परिसरात यापुढे बकऱ्यांचा बळी देण्याच्या प्रथेला निर्बंध घालण्यात आले आहेत. देवस्थान परिसरात कोणालाही देवीच्या नावाने बकऱ्यांना बळी देऊन मांसाहारी जेवणावळी, यात्रा करता येणार नाही. असे कोणी केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवार दि. 27 मे रोजी उचगाव ग्राम पंचायत, देसाई भाऊबंद कमिटी, देवस्की पंच कमिटी आणि ग्रामस्थांच्या झालेल्या बैठकीत बहुमताने घेण्यात आला आहे. अध्यक्षस्थानी उचगाव ग्राम पंचायत अध्यक्षा मथुरा तेरसे होत्या. उचगाव येथील गणेश-विठ्ठल-रखुमाई मंदिरामध्ये सोमवारी सकाळी ही बैठक बोलाविण्यात आली होती. प्रसिद्ध आणि जागृत असलेल्या मळेकरणी देवस्थानमध्ये वर्षभर मंगळवार आणि शुक्रवार बकऱ्यांचा बळी देऊन जेवणावळीचे मोठे कार्यक्रम होत असतात. या यात्रेमध्ये भक्ती कमी आणि मौजमस्ती, मांसाहार आणि मद्यपान जास्त, असा प्रकार घडत आहे. यावरच जोर दिला जात असल्याने उचगाव ग्रामस्थांचे जिणे कठीण झाले होते.

सर्वत्र दुर्गंधी, ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका

यात्रेत देवीच्या नावाने देण्यात येणाऱ्या पशुबळीमुळे, बकऱ्यांच्या टाकाऊ पदार्थामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून ग्रामस्थांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता. याबरोबरच वाहतुकीची सातत्याने होणारी कोंडी परिणामी ग्रामस्थांना तसेच उचगाव-कोवाड मार्गावर ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मद्यपान करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालल्याने मळेकरणी देवीच्या परिसरात असलेल्या शेतवडीत बिअर आणि दारू ढोसून त्या बाटल्या जाताना फोडून जाणाऱ्या तळीरामांमुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे, तसेच केरकचरा काढणे शेतकऱ्यांना मुश्कील झाले आहे. या घाणीमुळे कुत्र्यांची संख्या वाढली असून अनेकांना आपला जीव मुठीत घेऊन फिरण्याची वेळ आली आहे. याबरोबरच याच भागात मराठी, कन्नड प्राथमिक शाळा असून या मुलांच्या आरोग्यालाही मोठा धोका निर्माण झाला होता. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र असून या केंद्रात येणाऱ्या ऊग्णांना दुर्गंधीचा सामना करण्याची वेळ आली होती. या आमराईतून कोनेवाडी, तुरमुरी येथून ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनी तसेच शेतवडीत ये-जा करणाऱ्या महिलांची छेडछाड केली जाते. या सर्वांचा सारासार विचार करून सदर यात्रा बंद करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या बैठकीमध्ये प्रामुख्याने ग्राम पंचायत उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, पुंडलिकराव कदम-पाटील, युवराज कदम, बी. एस. होनगेकर, बाळासाहेब देसाई, डॉ. प्रवीण देसाई, संभाजी कदम, रामा कदम यांनी प्रामुख्याने आपले विचार मांडले. स्वागत एन. ओ. चौगुले यांनी केले. आभार एल. डी. चौगुले यांनी मानले.

मंगल कार्यांलयांमध्येही यात्रेवर बंदी

मंगळवार, शुक्रवार उचगाव परिसरातील मंगलकार्यालयांमध्ये कोणालाही यात्रा करता येणार नाही. तसे आढळल्यास त्यांच्यावरही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा ग्राम पंचायतीच्यावतीने बजावण्यात आला आहे. बैठकीत पीडीओ शिवाजी मडवाळ यांनी यापूर्वी देवस्थान कमिटी आणि ग्राम पंचायत यांच्यामध्ये झालेल्या पत्रव्यवहाराची संपूर्ण माहिती यावेळी दिली.

मंदिरात येणाऱ्या भाविकांना बंदी नाही

देवीच्या आमराईमध्ये मंदिरात येणाऱ्या भाविकांना बंदी नाही. रितीरिवाजाप्रमाणे ओटी भरणे, गाऱ्हाणा घालणे, ज्या प्रथा आहेत त्या नेहमीप्रमाणे चालू राहतील. देवीच्या दर्शनासाठी कोणालाही बंदी नाही. मात्र यात्रा करायची असेल तर त्यांनी देवीचा कुंकू व फूल घेऊन बकऱ्याला लावून त्यांनी आपल्या घरी ही यात्रा करावी आणि पै-पाहुण्यांना जेवणावळी आपल्याच परिसरात कराव्यात. मात्र उचगाव आमराई, देवीच्या परिसरामध्ये ही यात्रा करण्यावर पूर्णपणे निर्बंध लावण्यात आले आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article