राज्यात तंबाखू, निकोटीनयुक्त उत्पादनांवर बंदी
वर्षभरापर्यंत आदेश लागू : अन्न सुरक्षा विभागाकडून जनतेच्या आरोग्य हितासाठी पाऊल
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर : अन्न सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने राज्य सरकारने बुधवारी गुटखा, तंबाखू किंवा निकोटीन असलेल्या पानमसाला उत्पादनांवर एक वर्षाची बंदी घातली आहे. तंबाखू किंवा निकोटीन असलेल्या गुटखा, पान मसालाचे उत्पादन, साठा, वितरण, वाहतूक आणि विक्री यावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, पान मसाल्यात मिसळण्यासाठी स्वतंत्रपणे पॅक करून विक्री केल्या जाणाऱ्या तंबाखूजन्य उत्पादनांनाही ही बंदी लागू करण्यात आली आहे.
अन्न सुरक्षा विभागाच्या आयुक्तांच्या या निर्णयामुळे राज्यभरात अशा उत्पादनांचे उत्पादन आणि विक्री एक वर्षासाठी पूर्णपणे बंद होईल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक, वितरक, किरकोळ विक्रेत्यांसह संबंधितांवर अधिकारी कारवाई करतील. गंभीर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरणाऱ्या तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांच्या सेवनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
विक्रीवर बंदी
अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता कायदा-2006 च्या कलम 30(2)(अ) आणि अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता (विक्रीवरील बंदी आणि निर्बंध) नियम-2011 च्या नियम 2.3.4 अंतर्गत असलेल्या अधिकारांचा वापर करून अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाने 10 ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी केली आहे, असे अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त के. श्रीनिवास यांनी पत्रकात म्हटले आहे. जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी, राज्यात तंबाखू आणि निकोटीनयुक्त उत्पादनांच्या विक्री आणि पुरवठ्यावर बंदी घालण्यात आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
निषिद्ध असणारे तंबाखू आणि निकोटीनयुक्त उत्पादनांची निर्मिती, विक्री किंवा पुरवठा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांना कळवावे. निरोगी व व्यसनमुक्त कर्नाटक घडवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. ही अधिसूचना, अंमलबजावणीच्या तारखेपासून राज्यभरात एक वर्षासाठी लागू राहील, असे त्यांनी सांगितले.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबवली जात असून, गुटखा, पान मसाला आणि तंबाखू/किंवा निकोटीन असलेल्या इतर प्रतिबंधित उत्पादनांचे उत्पादन, साठा, वाहतूक, पुरवठा आणि विक्री यावर नजर ठेवली जात आहे, असे त्यांनी सांगितले.