हॉटेलमध्ये प्लास्टिक वापरावर बंदी
आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव : दोन दिवसात आदेश : आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे सिद्ध
बेंगळूर : अनेक हॉटेल, उपाहारगृहे, स्ट्रीट फूड स्टॉलवर इडली तयार करण्यासाठी प्लास्टिक कव्हरचा वापर करतात. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे नमुने तपासणीवरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे राज्यातील हॉटेल, उपाहारगृहांमध्ये प्लास्टिक वापरावर निर्बंध घालण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी सांगितले. दोन दिवसात यासंबंधीचा आदेश जारी केला जाईल, असेही ते म्हणाले. विविध खाद्यपदार्थांच्या दुकानांमधून गोळा केलेल्या इडलीच्या नमुन्यांपैकी सुमारे 50 टक्के नमुने असुरक्षित असल्याचे आहार विभागाच्या प्रयोगशाळेतून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील हॉटेल, उपाहारगृहांमध्ये प्लास्टिकचा वापर निषिद्ध केला जात आहे.
हॉटेल, स्ट्रीट फूड स्टॉलवर यापुढे प्लास्टिक कव्हरचा वापर करता येणार आहे. अन्नपदार्थ बनविताना, वितरित करताना देखील त्याचा वापर करू नये. पदार्थांच्या उष्णतेमुळे उत्सर्जित होणाऱ्या घटकांमुळे खाद्यपदार्थ विषारी बनतात. यामुळे कर्करोगाचा धोकाही अधिक आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये प्लास्टिकऐवजी कापडाचा वापर अनिवार्य करणारे नियम जारी करण्यात येतील, असेही मंत्री दिनेश गुंडूराव यांनी सांगितले आहे.
कर्नाटक अन्न सुरक्षा विभागाला 52 हॉटेल्समध्ये इडली तयार करण्यासाठी पॉलिथिन पेपर वापरण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. पॉलिथिन, विशेषत: पातळ पेपर कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे सरकार हॉटेल उद्योगात प्लास्टिकचा वापर करण्यास परवानगी देत नाही. अन्न सुरक्षा विभागाने राज्यभरात 251 ठिकाणी इडलीचे नमुने गोळा केले होते. यापूर्वी इडली तयार करताना कापडाचा वापर केला जात होता. पण अलीकडे हॉटेल्समध्ये प्लास्टिकचा वापर सुरू झाल्याचे आढळले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी जाऊन पाहणी केली. 251 पैकी 52 हॉटेलमध्ये प्लास्टिकचा वापर होत असल्याचे आढळून आले. प्लास्टिक कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतो. याचा परिणाम इडलीवर होऊन ते सेवन करणाऱ्यांच्या आरोग्याला बाधक ठरते. त्यामुळे अन्ननिर्मिती प्रक्रियेत प्लास्टिकचा वापर करण्यास बंदी घातली जाईल, असेही ते म्हणाले.
कार्सिनोजेनिकपासून कर्करोग
अलीकडे हॉटेलमध्ये इडली तयार करताना प्लास्टिक पेपरचा वापर होत आहे. यामुळे आरोग्याला धोकादायक ठरणारे कार्सिनोजेनिक घटक इडलीवाटे शरीरात जातात. परिणामी कर्करोगाचा धोका वाढतो.