शाळांच्या परिसरात ‘जंक फूड’वर बंदी
अन्न सुरक्षा-औषध प्रशासनाचा आदेश : जागृतीचे आवाहन
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर :
कर्नाटक अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने (एफडीए) शैक्षणिक संस्थांच्या आवारात आणि त्यांच्या 50 मीटर परिसरात ‘जंक फूड’वर बंदी घातली आहे. मोठ्या प्रमाणावर फॅट, साखर आणि मीठ (एचएफएसएस) असलेल्या खाद्यपदार्थांची विक्री, मोफत वितरण, जाहिरात आणि प्रचार करण्यास निर्बंध घातले आहेत. अशा खाद्यपदार्थांमुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढून मुलांच्या आरोग्यावर व एकाग्रतेवर विपरित परिणाम होऊ शकतो, असे एफडीएने म्हटले आहे.
एफडीएच्या नवीन निर्देशांनुसार, शाळा आणि महाविद्यालयांना त्यांच्या परिसरात एचएफएसएस खाद्यपदार्थांची विक्री होणार नाही याची खात्री करण्याचे आणि जंक फूडची विक्री व सेवन टाळण्यासंबंधी सूचना देणारे फलक ठळकपणे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मार्गदर्शन सूचनेनुसार शाळांच्या परिसरात असलेल्या बेकरी, हॉटेल, कॅन्टीन आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत वैध परवाने किंवा नोंदणी असणे तसेच स्वच्छता व अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात नियमित तपासणी करण्याचे निर्देश अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार विक्री परवान्यांचे निलंबन, रद्द, आहार उत्पादनांची जप्ती व न्यायालयीन कारवाई होऊ शकते.
अन्न सुरक्षा व औषध प्रशासनाने शाळांना पौष्टिक आहाराविषयी जागरुकता निर्माण करून जंक फूडच्या सेवनापासून परावृत्त करावेत. याकरिता विविध प्रकारचे प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करून आरोग्याला हितकारक खाद्य सेवनाच्या सवयींना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले