जांबोटी-खानापूर महामार्गावर अवजड वाहनांना बंदी
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : 24 रोजीचा रास्ता रोको स्थगित
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी-खानापूर राज महामार्गावरून होणाऱ्या अवजड वाहतुकीवर बंदी घालण्याचा आदेश बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिला आहे.खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारपासून या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. जांबोटी-खानापूर राज्य महामार्गावर गेल्या महिन्याभरापासून गोवा-जांबोटी-खानापूर अशी मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असल्यामुळे या रस्त्याची पार दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यात अवजड वाहतूक करणारी वाहने अडकण्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प होऊन बससेवा तसेच इतर प्रवासी वाहतूक देखील बंद होत असल्यामुळे, या भागातील विद्यार्थी तसेच प्रवासी वर्गांची गैरसोय झाली होती. या संदर्भात भाजपा बेळगाव जिल्हा प्रधान कार्यदर्शी धनश्री सरदेसाई-जांबोटीकर तसेच जांबोटी ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष सुनील देसाई, जांबोटी पीकेपीएसचे संचालक जयवंत देसाई, यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करून जांबोटी-खानापूर महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करावी तसेच या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी केली होती.
बंदी आदेश बजाविल्यामुळे जांबोटी भागातील नागरिकांमधून समाधान महिन्याभरापासून या रस्त्यावरुन अवजड वाहतूक सुरू असल्याने खानापूर-जांबोटी रस्त्याची अक्षरश: वाताहत झाली आहे. त्यामुळे अवजड वाहतुकीवर बंदी घालावी, अशी मागणी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन आमदार हालगेकर यानी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून या मार्गावरील अवजड वाहतुकीवर बंदी घालून ती रामनगर, अनमोडमार्गे वळविण्याची सूचना केली होती. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांनी कारवार जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर त्यांनी रामनगर, अनमोड मार्गे अवजड वाहतूक वळविण्यास अनुमती दिली. जांबोटी-खानापूर राज्य महामार्गावरून अवजड वाहतुकीला बंदी घालण्याचा आदेश बजाविल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
बंदी आदेशामुळे रोको स्थगित
दरम्यान जांबोटी-खानापूर राज महामार्गावरून सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे या रस्त्यावरील खड्ड्यात वाहने अडकून रस्त्यावरील वाहतूक वारंवार ठप्प होत असल्याने त्याचा बस सेवेवर देखील विपरीत परिणाम झाला होता. बससेवा बंद झाल्यामुळे विद्यार्थी वर्ग व प्रवासी वर्गाचे अतोनात हाल होत होते. या रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद करून रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, या मागणीसाठी येत्या मंगळवार दि. 24 सप्टेंबर रोजी जांबोटी येथे रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र तत्पूर्वी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी या मार्गावरील अवजड वाहतुकीला बंदी घातल्यामुळे दि. 24 सप्टेंबर रोजी जांबोटी येथे होणारा रस्ता रोको स्थगित करण्यात आला असल्याचे, जांबोटी ग्राम पंचायत उपाध्यक्ष सुनील देसाई यांनी कळविले आहे.