For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांवर अवजड वाहतुकीला बंदी

10:56 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांवर अवजड वाहतुकीला बंदी
Advertisement

विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका : वाहतूक पोलिसांसोबत करणार चर्चा

Advertisement

बेळगाव : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रहदारी पोलिसांकडून गोगटे सर्कल मार्गे शहरात येणारी अवजड वाहने ग्लोब थिएटरमार्गे वळविण्यात येतात. परंतु, यामुळे शालेय विद्यार्थी तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डमधील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. वाहतूक पोलिसांना कळवूनही त्यांच्याकडून अवजड वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे यापुढे कॅम्पमधून अवजड वाहतुकीला निर्बंध घालण्याचा निर्णय कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत घेण्यात आला. ट्रक, लॉरी, डंपर, ट्रॅक्टर यासारखी अवजड वाहतूक करणारी वाहने पोलिसांकडून इंडिपेंडंट रोडमार्गे वळविली जातात. या परिसरात सेंट जोसेफ, सेंट पॉल्स, बेळगाव मिलिटरी स्कूल, केंद्रीय विद्यालय व इतर शाळा असल्यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांची ये-जा सुरू असते. तसेच हा परिसर रहिवासी वसाहत असल्यामुळे अवजड वाहतूक करणे धोक्याचे ठरत आहे. कॅन्टोन्मेंट कायदा 2006 च्या अन्वये कॅम्प परिसरातील अवजड वाहतुकीवर निर्बंध आणले जाणार आहेत. अवजड वाहतूक इतर मार्गे वळविण्यासंदर्भात रहदारी पोलिसांसोबत चर्चा करण्यात येणार आहे. निर्बंध असूनदेखील अवजड वाहतूक सुरूच राहिल्यास अशा वाहनांवर दंडात्मक कारवाईचा इशारा सीईओंनी दिला आहे.

अपघातांना ठरतेय आमंत्रण

Advertisement

यापूर्वी आंदोलन छेडल्यामुळे काही दिवस अवजड वाहतूक बंद होती. परंतु, पुन्हा एकदा अवजड वाहतूक सुरू झाल्याने विद्यार्थी व पालकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. अवजड वाहनांमुळे अनेक विद्याथ्यर्नां अपघात झाले असून हे प्रकार रोखण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने आता पुढाकार घेतला आहे.

Advertisement
Tags :

.