शेतकऱ्यांनो सावधान! पंचगंगा, वारणा, दूधगंगा नद्यांवरील पाणी उपसा आजपासून पूर्णपणे बंद
वारणावती : कोल्हापूर पाटबंधारेविभाग (उत्तर) यांनी यापूर्वी शिथिल केलेला उपसा बंदी आदेश पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. इरिगेशन फेडरेशन व लाभधारक शेतकरी यांच्यासोबत १६ जून रोजी झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी दिली आहे.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशानुसार पंचगंगा, भोगावती, दूधगंगा, वारणा, तुळशी, कासारी, कडवी, कुंभी व धामणी-जांभळी या नद्यांच्या दोन्ही तीरांवरील भागातशेतीसाठी नदीपात्रातून पाणी उपसा करण्यावर आज (दि. १६ जून) पासून पुढील आदेशापर्यंत बंदी लागू करण्यात आली आहे.
धरणांतील आणि प्रकल्पांतील मर्यादित पाणीसाठा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता अबाधित ठेवण्यासाठी सिंचनासाठी पाण्याचा अनावश्यक वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच औद्योगिक व अन्य वापरातील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडून जलप्रदूषण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही संबंधितांना देण्यात आले आहेत.