For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्नाटकात कलर कॉटन कॅन्डीवर बंदी; गोबी मंच्युरीत कृत्रिम रंगाचा वापर निषिद्ध

06:45 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर्नाटकात कलर कॉटन कॅन्डीवर बंदी  गोबी मंच्युरीत कृत्रिम रंगाचा वापर निषिद्ध
Advertisement

 : आदेशाचे उल्लंघन झाल्यास 7 वर्षांपासून आजीवन कारावास

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

कृत्रिम रंग मिसळल्याने जनतेच्या आणि ग्राहकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याने राज्य सरकारने कलर कॉटन कॅन्डी आणि गोबी मंच्युरी तयार करताना धोकादायक कृत्रिम रंग वापरण्यावर बंदी घातली आहे. शेजारील तामिळनाडू आणि पॉन्डिचेरीमध्ये यापूर्वीच कॉटन कॅन्डीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या पाठोपाठ कर्नाटकातही कलर कॉटन कॅन्डीची निर्मिती आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

Advertisement

अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता खात्याने सोमवारी यासंबंधीचा आदेशपत्रक जारी केले आहे. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री दिनेश गुंडूराव यांनी याविषयी पत्रकार परिषदेतही माहिती दिली. राज्यभरात विकल्या जाणाऱ्या गोबी मंच्युरी आणि कलर कॉटन कॅन्डीचा दर्जा कृत्रिम रंगाच्या वापरामुळे खराब आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर  राज्यभरात विक्री होणाऱ्या गोबी मंच्युरी आणि कॉटन कॅन्डीचे नमुने गोळा करून ते प्रयोगशाळेत तपासण्यात आले.

कॉटन कँडीमध्ये हानीकारक ‘रोडमाइन-बी’ आणि गोबी मंच्युरीत ‘सनसेट यलो’ रंग आणि ‘टारट्राझिन’ आढळून आले आहेत. त्यामुळे रंगीत कॉटन कॅन्डी विकता येणार नाही. तसेच गोबी मंच्युरी तयार करताना कोणताही कृत्रिम रंग वापरल्यास अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता कायदा 2006 च्या नियम 59 अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल. दोषी आढळल्यास संबंधितांना किमान 7 वर्षांपासून आजीवन कारावास आणि 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, कायद्याचे उल्लंघन केल्यास न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.

आम्ही गोबी मंच्युरीचे 171 नमुने जमा केले. त्यांची चाचणी केली असता 107 नमुन्यांमध्ये कृत्रिम रंगाचा वापर केल्याचे आढळून आले तर 64 नमुने सुरक्षित असल्याचे आढळले. असुरक्षित गोबी मंच्युरीमध्ये टारट्राझिन, सनसेट आणि कार्मोसीन यासारखे कृत्रिम रंग वापरल्याने आढळले आहे. ते आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत, अशी माहितीही दिनेश गुंडूराव यांनी दिली. येत्या दिवसांत कबाब पावडरसह इतर खाद्यपदार्थांचीही चाचणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरक्षेसाठी....

कृत्रिम रंगांचा वापर झालेल्या खाद्यपदार्थांच्या दीर्घकालिन वापरामुळे मुलांसह वापरकर्त्यांना कर्करोगासारख्या आजारांची बाधा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृत्रिम रंग वापरून तयार केले जाणाऱ्या पदार्थांचे नागरिकांनी सेवन करू नये किंवा मर्यादित प्रमाणात सेवन करावे, असे अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता खात्याने आदेशात म्हटले आहे.

गोबी मंच्युरीच्या नमुन्यांचा तपशील

गोळा केलेले नमुने - 171

कृत्रिम रंग असलेले असुरक्षित नमुने - 107

कृत्रिम रंग नसलेले सुरक्षित नमुने - 64

कृत्रिम रंगाचा वापर झालेल्या नमुन्यांमध्ये टार्ट्राझिन, सनसेट यलो आणि कार्मन आढळले.

कॉटन कॅन्डीच्या नमुन्यांचा तपशील

गोळा केलेले नमुने - 25

कृत्रिम रंग असलेले असुरक्षित नमुने - 15

कृत्रिम रंग नसलेले सुरक्षित नमुने - 10

कृत्रिम रंगाचा वापर झालेल्या नमुन्यांमध्ये टारट्राझिन, सनसेट यलो आणि रोडमाइन-बी आढळले.

Advertisement
Tags :

.