प्रचार करण्यास महाडिकांना बंदी घाला
कोल्हापूर :
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर महिलांच्या बँक खात्यावर महिन्याला तीन हजार रुपये दिले जाणार आहेत. यामध्ये भाजपचा प्रचार करतात म्हणून दुजाभाव केला जाणार नाही. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात महिलांना भीती दाखवून धमकी देणाऱ्या भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करुन निवडणूक आयोगाने महाडिक यांना प्रचार करण्यावर बंदी घालावी, अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा अलका लांबा यांनी केली.
जिल्हा काँग्रेस कमिटीत सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. खासदार प्रियांका गांधी कोल्हापुरात दौऱ्यावर आल्यानंतर महिलांना धमकावणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतील, असेही लांबा यांनी नमूद केले.
लांबा म्हणाल्या, कोल्हापूरमध्ये महाडिक यांनी निवडणूक आचार संहितेचा भंग केला आहे. महिलांना खुलेआम धमकी देऊन भीती दाखवली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचारवर बंदी घालण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली जाणार आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनाकडेही याची मागणी केली जाईल. तसेच, प्रत्येक पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली जाणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोग आणि पोलीस किती निर्भिडपणे कारवाई करतात ते पाहूया. राष्ट्रीय महिला काँग्रेस ही गोष्ट हलक्यात घेणार नाही. निवडणूक अधिकाऱ्यांनी महाडिक यांना नोटीस पाठवली आहे. मात्र, निवडणुकीला केवळ सात दिवस राहिले आहेत. नोटीस देण्याऐवजी त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली पाहिजे. यावेळी, भारती पवार, सरलाताई पाटील, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.
कारवाईच्या मागणीचे पोलिसांना निवेदन
कोल्हापूर : लाडक्या बहिण योजनेचे लाभ घेणाऱ्या महिला कॉँग्रेसच्या प्रचार सभेत दिसल्या तर त्यांचे व्हिडीओ करा, फोटो काढा, त्यांची व्यवस्था केली जाईल. अशा प्रकारे धमकी देणारे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर पोलीस व निवडणूक आयोगाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय महिला कॉग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्याकडे सोमवारी सायंकाळी निवेदनाव्दारे केली. यावेळी कॉग्रेसच्या निरीक्षक आरती सिंग, कोल्हापुरातील नेत्या सरलाताई पाटील, चंदा बेलेकर, विनायक घोरपडे, ऋषीकेश पाटील आदी हजर होते.