कॅसिनोत लहान मुलांना प्रवेशबंदी करा
पणजीकार अगेन्स्ट कॅसिनो संघटनेची पोलिसांकडे मागणी
त.भा. प्रतिनिधी
पणजी : मांडवी नदीतील कॅसिनो बोटींवर ‘किड्स झोन‘च्या नावाखाली लहान मुलांना प्रवेश दिला जात असून, हे गोवा बाल हक्क कायद्याचे गंभीर उल्लंघन असल्याचा आरोप ‘पणजीकार अगेन्स्ट कॅसिनो’ या संघटनेने केला आहे. या बेकायदेशीर प्रकाराविरोधात वाल्मिकी नाईक, सबिना मार्टिन्स आणि क्रिसेल डायस यांनी शनिवारी रात्री उशिरा पणजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
यावेळी माहिती देताना क्रिसेल डायस म्हणाल्या की, कायद्यानुसार 21 वर्षांखालील कोणालाही कॅसिनो परिसरात प्रवेश देण्यास सक्त मनाई आहे. असे असूनही अनेक कॅसिनो नौकांवर जाणीवपूर्वक लहान मुलांसाठी ‘प्ले झोन’ तयार करण्यात आले आहेत. इतकेच नाही तर तिथे मुलांच्या पार्ट्या आयोजित केल्या जातात आणि सोशल मीडियावर त्याची उघडपणे जाहिरात केली जाते. कॅसिनोंनी स्वत: अशा पार्ट्यांचे फोटो आणि व्हिडिओ अपलोड केले आहेत. तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण नौकेला ‘कॅसिनो परिसर’ मानले जाते, त्यामुळे तिथे मुलांसाठी स्वतंत्र विभाग असणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.
सामाजिक कार्यकर्त्या सबीना मार्टिन्स यांनी सांगितले की, गोवा बाल हक्क कायद्याच्या कलम 8 नुसार लहान मुलांना कोणत्याही प्रकारे जुगार खेळण्यासाठी प्रवृत्त करणे हा गंभीर गुन्हा आहे. असे असतानाही कॅसिनो व्यवस्थापन मुलांच्या कार्यक्रमांची ऑनलाइन आणि ऑफलाईन जाहिरात देत आहे. शैक्षणिक संस्थांच्या परिसरातही या संदर्भात होर्डिंग्ज लावले जातात. या प्रकरणी पणजी पोलिसांनी गुन्हा नोंदवावा अशी मागणी आम्ही केली आहे. खरे तर गेमिंग आयुक्तांनी वेळेत यावर कारवाई करणे अपेक्षित होते, पण त्यांनी अद्याप कोणतेही पाऊल उचललेले नाही, असेही त्या म्हणाल्या.
सध्या पणजीतील कॅसिनोंमध्ये नियम मोडून अनेक प्रकार सुरू आहेत. कॅसिनो ही मुलांच्या मनोरंजनाची जागा असल्यासारखी जाहिरात केली जात आहे. कॅसिनोच्या या बेकायदेशीर प्रकारांविरुद्ध आमचा लढा सुरूच राहील, असे वाल्मिकी नाईक यांनी सांगितले.