जिल्हा शिक्षक संघाच्या नेतेपदी बलवंत पाटील
सातारा :
सातारा जिल्हा शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून नेतेपदी बलवंत पाटील यांची तर सातारा जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत यादव यांची निवड करण्यात आली. कार्यकारी अध्यक्षपदी हणमंत रसाळ यांची तर शशिकांत कांबळे, शशिकांत खाडे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
राज्य शिक्षक संघाची सहविचार सभा येथील जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभागृहात पार पडला. यावेळी राज्याचे नेते संभाजीराव थोरात, संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब मारणे व राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बलवंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
संभाजीराव थोरात म्हणाले की, सध्याचा शिक्षकांचा काळ हा समस्यांमुळे संक्रमणाचा काळ आहे. संच मान्यता, बदल्या, अशैक्षणिक कामे याबरोबरच अनेक समस्यांचा डोंगर शिक्षकांपुढे आहे. सर्वांच्या एकत्रित ताकतीवर शिक्षक संघ यातून निश्चितपणे मार्ग काढेल.
बाळासाहेब मारणे म्हणाले, आजपर्यंत संघाने शिक्षकांच्या न्याय्य हक्कासाठी लढा देऊन आपल्या मागण्या पदरात पडल्या आहेत. शिक्षण व्यवस्थेचा पाया मजबूत करण्यासाठी झटणारे शिक्षक मोकळेपणाने अध्ययन करतील, अशी परिस्थिती निर्माण करणे हे संघाचे ध्येय आहे.
शिक्षक संघाच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल आभार व्यक्त करून बलवंत पाटील म्हणाले, संघाच्या एकीच्या बळावर संघर्ष उभा करून शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही यथाशक्ती प्रयत्न करू. यासाठी शासनाबरोबर आमची भूमिका सौहार्दाची राहील, परंतु संच मान्यता, बदल्या, पदोन्नती आदींबाबत वेळ आली तर रस्त्यावर उतरून लढा उभारणार आहे. प्रास्ताविक चंद्रकांत यादव यांनी केले. सुभाष ढालपे यांनी आभार मानले.
राष्ट्रीय शिक्षक महासंघाच्या कार्यकारी संघटकपदी दिलीप मुळीक व तानाजी ढमाळ, फलटण यांची निवड करण्यात आली. राज्य संपर्कप्रमुख म्हणून दीपक गिरी, खटाव, राज्य संघटक पदी रोहिदास कापसे, खंडाळा तर पुणे विभागीय कार्याध्यक्षपदी विजय खरात, माण यांची निवड करण्यात आली.
संघाची सातारा जिल्हा कार्यकारिणी अशी-अध्यक्ष-चंद्रकांत यादव खंडाळा, कार्यकारी अध्यक्ष- हणमंत रसाळ सातारा, कार्याध्यक्ष- शशिकांत कांबळे पाटण व शशिकांत खाडे माण, कोषाध्यक्ष -राजेंद्र दगडे वाई, सरचिटणीस -दत्ता पाटील कराड, संपर्कप्रमुख- दत्तात्रय ढेकळे फलटण, राहुल खैरमोडे पाटण, प्रसिद्धी प्रमुख -प्रदीप कुंभार कराड, उमेश निकम सातारा, संघटक- अमित कारंडे महाबळेश्वर, निवृत्ती ढमाळ खंडाळा, सल्लागार- बी. एस. कणसे सातारा व कार्यकारी चिटणीस -सूर्यकांत कदम खटाव.
केंद्रप्रमुख पदाधिकारी - अध्यक्ष - सुभाष ढालपे, कार्याध्यक्ष सुनीता शेडगे, कोषाध्यक्ष- नवनाथ गावडे, सरचिटणीस- विजय गंबरे.