For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाळूमामाचा रथ व दुधाच्या घागरीचे निढोरीत जल्लोषी स्वागत! द्वादशीला बाळूमामांना दूधाने अभिषेक

06:13 PM Apr 05, 2024 IST | Abhijeet Khandekar
बाळूमामाचा रथ व दुधाच्या घागरीचे निढोरीत जल्लोषी स्वागत  द्वादशीला बाळूमामांना दूधाने अभिषेक
Advertisement

मुरगुड वार्ताहर

महाराष्ट्र- कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सद्गुरु बाळूमामा भंडारा उत्सवासाठी मेंढ्यांच्या दुधाच्या घागरी एकत्रितपणे बाळूमामा रथातून विधीपूर्वक आदमापुरकडे नेण्याचा कार्यक्रम २ कि. मी. वर असलेल्या निढोरी ता. कागल येथे धार्मिक व भक्तीपूर्ण वातावरणात जल्लोषी मिरवणुकीने संपन्न झाला. महाराष्ट्र- कर्नाटकात कानाकोपऱ्यात असलेल्या १९ बग्गीतून आणलेल्या घागरींचे बाळूमामा देवस्थानच्या प्रशासक रागिनी खडके यांनी सकाळी स्वागत व पूजन केले.

Advertisement

भंडारा उत्सवामध्ये खिरीचा महाप्रसाद हा महत्त्वाचा कार्यक्रम मानला जातो. बाळूमामा स्वतः बकऱ्यांच्या कळपातील मेंढ्यांच्या दुधाची घागर महाप्रसादामध्ये वापरायचे. ही घागर निढोरीतून जल्लोषी मिरवणुकीने नेण्याची दरवर्षीची प्रथा आहे. सद्गुरू बाळुमामानी स्वतः जतन केलेल्या बकऱ्या १९ ठिकाणच्या बग्गी (दीड ते दोन हजार बकऱ्यांचा एक कळप) मध्ये असतात. प्रथेप्रमाणे भंडारा उत्सवा निमित्ताने उद्या होणाऱ्या महाप्रसादासाठी आदल्या दिवशी सर्व बग्गीच्या घागरी निढोरीमध्ये एकत्र करण्यात आल्या. वाजत गाजत आलेल्या प्रत्येक बग्गीतील घागरीचे भाविक ग्रामस्थ महिलांनी औक्षण करून स्वागत केले.

दरम्यान, आदमापुरातून आलेल्या बाळूमामा देवस्थानच्या रथाचे निढोरीमध्ये दुपारी आगमन झाले. यात्रेसाठी आलेले भाविक वेदगंगेमध्ये स्नान करून मारुती देवालयामध्ये जमले. येथूनच बाळूमामानी आपल्या भक्तांकडे सुपूर्द केलेल्या घागरींसह अन्य बग्गीतील दुधाच्या घागरी मानाच्या बैलगाडीतून रथासह दुपारनंतर आदमापुरकडे रवाना झाल्या. उद्या द्वादशी दिवशी सकाळी या घागरीतील दूधाने बाळूमामांना अभिषेक घालण्यात येईल. उर्वरित घागरीतील मेंढ्यांचे दूध महाप्रसादामध्ये वापरले जाणार आहे. कर्नाटकातील औरनाळ मधून आलेले दिंडीतील भाविक भक्त या ठिकाणी थांबून रथाबरोबर पुढे मार्गस्थ झाले. उत्साही भक्तांनी जेसीबीतून भंडाऱ्याची उधळण केली. यावेळी मार्गावर नक्षीदार रांगोळी, रंगीबेरंगी फुलांची पखरण, कीर्तन, प्रवचना बरोबर टाळ-मृदंगांच्या गजर, ढोल-ताशांच्या दणदणात भंडाऱ्यांची मुक्त उधळण करीत 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं!' चा जल्लोष केला. येथील बाळूमामा भक्त सेवकांमार्फत सर्व भक्तांना मोफत खिचडी, फळे, ताक, कोकम सरबत पुरवण्यात आले. पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्था व गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चोख व्यवस्था केली.

Advertisement

दुधाच्या घागरी नेण्याची प्रथा प्रिय !
अभिषेक व महाप्रसादासाठी निढोरीतून आदमापुरमध्ये रथ व मानाच्या बैलगाडीतून दुधाच्या घागरी नेण्याचा धार्मिक सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडण्याची प्रथा रूढ झाली असून हा सोहळा पार पाडण्यासाठी निपाणी राधानगरी रोडवरील तब्बल दोन किलोमीटरचा परिसर लाभत असल्याने या सोहळ्याला दिवसेंदिवस भक्तांची उपस्थिती वाढत चालली आहे.

Advertisement

.