बलुचिस्तानी नेत्याची स्वातंत्र्याची घोषणा
‘बलुचिस्तान पाकिस्तानचा भाग नाही’ : भारताकडून मदतीचे आवाहन
वृत्तसंस्था/इस्लामाबाद
बलुच नेते मीर यार बलोच यांनी बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य जाहीर केले. याप्रसंगी त्यांनी यामागील कारण म्हणून बलुच लोकांविरुद्ध दशकांपासून सुरू असलेले मानवी हक्कांचे उल्लंघन, अपहरण आणि हिंसाचार यांचा उल्लेख केला. मीर यार बलोच यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये बलुचिस्तानच्या लोकांनी त्यांचा ‘राष्ट्रीय निर्णय’ दिला असून जगाने आता आमच्या पाठीशी उभे रहावे, असे म्हटले आहे. बलुचिस्तान हा आता पाकिस्तानचा भाग नाही. हा त्यांचा राष्ट्रीय निर्णय असल्यामुळे जग आता मूक प्रेक्षक राहू शकत नाहीत असे सांगत बलोच यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी भारतासह जागतिक समुदायाकडून मान्यता आणि पाठिंबा मागितला आहे. मीर यार बलोच यांनी भारताकडून अनेक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. भारतीय प्रसारमाध्यमे, युट्यूबर्स आणि बुद्धिजीवींनी बलुचांना पाकिस्तानी लोक म्हणू नये असे आवाहन केले.
आम्ही पाकिस्तानी नाही, आम्ही बलुची आहोत असे सांगतानाच त्यांनी पाकव्याप्त काश्मीरबद्दल (पीओके) भारताच्या भूमिकेचे समर्थन केले. हा परिसर रिकामा करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय समुदायाला केले. भारत पाकिस्तानी सैन्याला हरवू शकतो. जर पाकिस्तानने लक्ष दिले नाही, तर पाकिस्तानी लष्कराच्या लोभी जनरलनाच या रक्तपातासाठी जबाबदार धरावे लागेल. इस्लामाबाद पीओकेमधील लोकांचा ढाल म्हणून वापर करत आहे, असेही मीर यार बलोच पुढे म्हणाले. मीर यार बलोच यांच्या मते, बलुचिस्तानवर परकीय शक्तींच्या मदतीने जबरदस्तीने कब्जा करण्यात आला. बलुचिस्तानमध्ये बऱ्याच काळापासून मानवी हक्कांचे उल्लंघन सुरू आहे. पाकिस्तानी सैन्य आणि पोलीस लोकांवर हल्ला करतात. येथे परदेशी माध्यमांचा पोहोचणे खूपच मर्यादित असल्यामुळे बलुचिस्तानशी संबंधित बातम्या बाहेर येऊ शकत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
‘बीएलए’चा स्वातंत्र्यासाठी लढा
बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ही पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी संघटना आहे. त्याची स्थापना 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला झाली असून अनेक देशांनी तिला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. ही संघटना पाकिस्तानी लष्कर, सरकार आणि सीपीईसी सारख्या चिनी प्रकल्पांना लक्ष्य करत आहे. बीएलए आपल्या गनिमी म्हणजेच डोंगराळ भागात लपून सैन्यावर हल्ला करण्याच्या युद्धशैलीसाठी ओळखली जाते.