For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बळ्ळारी नाल्याच्या पुराचा शेतीला वेढा

10:34 AM Jul 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
बळ्ळारी नाल्याच्या पुराचा शेतीला वेढा
Advertisement

हजारो एकर शेती पाण्याखाली : पावसाचा जोर कायम : ओल्या दुष्काळाची भीती

Advertisement

बेळगाव : बळ्ळारी नाल्याला पूर आल्याने शिवार जलमय झाले आहे. मागील आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम असल्याने शिवारात पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे बळ्ळारी परिसरातील शेतकऱ्यांना चिंता लागली आहे. शिवाय सध्या  पावसाचा जोर वाढत असल्याने परिस्थिती गंभीर बनण्याची चिन्हे दिसत आहेत. मागील कित्येक वर्षांपासून बळ्ळारी नाल्याच्या पुराची समस्या कायम असल्याने दरवर्षी पावसाळ्यात शेतकऱ्यांना फटका बसू लागला आहे. त्यामुळे प्रशासन बळ्ळारी नाल्याचा प्रश्न कायमस्वरुपी कधी मार्गी लावणार? असा प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.

सध्या पावसाचा मारा सुरू आहे. त्यामुळे नाले पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाले आहेत. शिवारातील नाले आणि इतर पाणी बळ्ळारी नाल्यात येऊ लागले आहे. त्यामुळे बळ्ळारी नाल्यातील पाणी शेजारील शेतीमध्ये पसरले आहे. त्यामुळे हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. विशेषत: यामध्ये भात शेती अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे भात कुजण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. पाणी अधिक दिवस साचून राहिल्यास मोठा फटका बसण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे यंदा बळ्ळारी नाला परिसरातील शेतीला ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

Advertisement

बळ्ळारी नाल्यातील कचरा, जलपर्णी, माती, गाळ आणि इतर स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने पुराला सामोरे जावे लागत आहे. विशेषत: नाल्याची रुंदी आणि उंची देखील कमी झाल्याने अतिरिक्त पाणी शिवारात शिरत आहे. त्यामुळे परिसरातील शेती जलमय होऊ लागली आहे. प्रशासनाकडून केवळ नावापुरती स्वच्छता करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जातात. मात्र प्रत्यक्षात पावसाळ्यात परिस्थिती गंभीर बनते. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची मोठी हानी होऊ लागली आहे.

नाल्यातील कचरा हटविला

बळ्ळारी नाल्यात पाण्याचा निचरा थांबल्याने अडचणी वाढल्या आहेत. मंगळवारी जेसीबीच्या साहाय्याने वडगाव-यरमाळ मार्गावरील नाल्याजवळ स्वच्छता करण्यात आली. पुलाच्या तोंडावर अडकलेला कचरा जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आला. मात्र, शेती परिसरात अधिक प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे पुराचा धोका कायम आहे.

Advertisement
Tags :

.