महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बळ्ळारी नाला परिसरातील शिवाराला जलाशयाचे स्वरुप

10:56 AM Jul 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जिल्हा प्रशासन अन् पाटबंधारे खाते कधी लक्ष देणार?

Advertisement

बेळगाव : गेल्या चार दिवसांपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे बळ्ळारी नाला परिसर पुन्हा पुराच्या विळख्यात सापडला आहे. जवळपास शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली असून या जमिनीतील पीक यावर्षीही वाया गेले आहे. बळ्ळारी नाल्याची खोदाई करावी, अशी मागणी वारंवार करून देखील त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे यावर्षीही शेतकऱ्यांना हा फटका बसला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांतून तसेच जनतेतून प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. बळ्ळारी नाला हा दरवर्षीच शेतकऱ्यांना नुकसानीचा ठरत आहे. गेल्या 30 ते 35 वर्षांपासून या नाल्याच्या परिसरातील जमिनीतील पिके खराब होत चालली आहेत. वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह पाटबंधारे खाते, कृषिमंत्री व मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी करण्यात आल्या. मात्र, त्याबाबत कोणीच दखल घेतली नाही. याइतके दुर्दैव दुसरे नसल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

Advertisement

जोरदार पाऊस झाल्यानंतर प्रथम बळ्ळारी नाल्यालाच पूर येतो. नाल्यातील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे येळ्ळूर, धामणे, वडगाव, शहापूर, जुनेबेळगाव, अनगोळ, बसवन कुडची या परिसरातील शिवार पाण्याखाली जात आहे. जवळपास दरवर्षी हजारो एकर जमिनीतील भात व इतर पिके वाया जात आहेत. यावर्षीही बळ्ळारी नाला परिसरातील शिवारामध्ये जलाशयासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अन्नपूर्णेश्वरीनगर, केशवनगर तसेच धामणे रोड, यरमाळ रोड, जुनेबेळगाव परिसरातील अनेक घरेही या पाण्याच्या विळख्यामध्ये अडकली आहेत. पाऊस झाल्यानंतर केवळ पाहणी करायची. मात्र, त्यानंतर फिरकायचे नाही, असा प्रकार नेहमीच होत आहे. सध्या महानगरपालिका आयुक्त अशोक दुंडगुंटी यांनी भेट दिली. पाहणी केली. मात्र ते पुढे काय कार्यवाही करणार? हे गुपितच आहे.

यापूर्वीही पाटबंधारे खाते, कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी अनेकवेळा भेट दिली. पाणी भरलेले पाहून मोठे नुकसान झाल्याचे ते स्वत:च कबूल करत होते. मात्र, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई नाही तसेच पुढील वर्षी पूर येऊ नये म्हणून बळ्ळारी नाल्याची खोदाई करायची नाही. त्यामुळे पाहणी करून तरी त्याचा काय उपयोग? असा प्रश्न आता शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे. कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे खात्याने संयुक्तपणे त्याचा सरकारकडे पाठपुरावा करून बळ्ळारी नाल्याची खोदाई करून त्याचे पक्के बांधकाम करण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बळ्ळारी नाला परिसरातील हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. आता त्या शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे. यापूर्वी देण्यात येणारी नुकसानभरपाई ही तुटपुंजी होती. आता तरी या नुकसानीचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article