For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बळीराजांची दिवाळी शिवारातच

10:17 AM Nov 15, 2023 IST | Tarun Bharat Portal
बळीराजांची दिवाळी शिवारातच
Advertisement

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सुगी हंगाम जोमात : रताळी काढणी, भात मळणीची कामे सुरूच, पाडव्यानिमित्त शेतातून होते पांडवपूजा

Advertisement

वार्ताहर /किणये

दिवाळीचा सण तेजोमय प्रकाश देणारा मांगल्याचे प्रतिक असणाऱ्या या सणात सर्वत्र मंगलमय वातावरण दिसून येते. खासगी व सरकारी नोकरदार यांना दिवाळीची सुटी असते. या कालावधीत विविध वस्तुंची खरेदी, मिठाईचे वाटप, मित्रमंडळी, पाहुण्यांची गाठभेट अशी लगबग सुरू असते. असे असले तरी ग्रामीण भागात दिवाळीची परंपरेप्रमाणे पूजा करून बळीराजा मात्र शिवारातच दिवाळीच्या सणात दिसून आला. सध्या तालुक्यात सुगीचा हंगाम जोमाने सुरू झाला आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर शेतकरी भात कापणी, बटाटे-रताळी काढणे आदी कामांना सुरुवात करतात. रविवारपासून शेतकऱ्यांची या कामासाठी धडपड दिसून येत आहे. गुरुवारी वसुबारस पूजन करून दिवाळी सणाच्या पर्वाला सुरुवात झाली. रविवारी गावागावांमध्ये सामूहिक आरती करण्यात आल्या. शेतकऱ्यांनी शिवारात जाऊन भात पिकांची पूजा केली. या सणात ग्रामीण भागातील महिला तीन दिवस घरात शेणाने गवळणी बनवितात आणि त्या घरासमोर, रांगोळी काढून त्यामध्ये रोज एक गवळण ठेवण्यात येते. तसेच घराच्या चौकटीजवळ गवळण ठेवून त्याठिकाणी दिवा लावण्यात येतो. आजही ही परंपरा जपण्यात आलेली आहे. मंगळवारी पाडव्याच्या सणानिमित्त गवळणीच्या माध्यमातून घरासमोर गवळणी व पांडवांच्या प्रतिकृती बनविण्यात येणार आहेत. तसेच शेतकरी आपापल्या शेत शिवारात जाऊन पांडव पूजा करतात. याची तयारी महिला व शेतकरी करीत होते.

Advertisement

 तालुका दुष्काळग्रस्त बनला असला तरी शेतातील कामे सुरूच

यंदा पावसाने हुलकावणी दिली असल्यामुळे शेत शिवारातील भात व अन्य पिके सुकून गेली आहेत. बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त बनला आहे. तरीही शिवारात जे काही पीक पाणी शिल्लक आहे. त्याची सुगी करण्याची लगबग शेतकऱ्यांची सुरू झाली आहे. ग्रामीण परंपरेनुसार दिवाळीची पूजा विधी करून शेत शिवारात भात कापणीसह विविध कामे सोमवारीही सुरू होती. यामुळे सर्वांसाठी दिवाळी सण दोन चार दिवस सुटीत घालवायचा असला तरी शेतकऱ्यांना शेतात राबणे भागच पडते.

सण असला तरी शेतात काम करावेच लागते

यंदा पाऊस झाला नसल्यामुळे रताळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दिवाळी सण असला तरी शेतातील रताळी काढून ती मार्केटला नेण्यासाठी आम्ही शिवारात रताळ्याची काढणी करीत आहे. आमच्यासाठी हीच धान्यरुपी लक्ष्मी आहे. सध्या रताळ्याला 800 ते 1300 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. हा दर परवडणारा नाही. शासनाने रताळी पिकाला चांगला दर मिळवून द्यावा, अशी आमची मागणी आहे.

 - पांडुरंग चौगुले, बेळवट्टी

हमीभाव मिळावा हाच आमचा दिवाळीचा बोनस

आमचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. याला जोडधंदा म्हणून गोठ्यात आठ जनावरे आहेत. या जनावरांना रोज चारा हा द्यावाच लागतो. त्यामुळे उन्ह पाऊस असो किंवा सणवार असू दे, जनावरांना चरण्यासाठी आम्हाला सोडावेच लागते. सोमवारी अर्धा दिवस घरात दिवाळी साजरी करून दुपारनंतर जनावरांना चरण्यासाठी घेऊन जात आहेत. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमीभाव मिळावा, हाच आमच्यासाठी दिवाळीचा बोनस असणार आहे.

- भावकू पाटील, बेनकनहळ्ळी

Advertisement
Tags :

.