For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बालरथाला अपघात, अनर्थ टळला

12:47 PM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
बालरथाला अपघात  अनर्थ टळला
Advertisement

बेंदुर्डेहून कुंकळ्ळीला येताना बाळीत अपघात : एकूण 22 विद्यार्थी जखमी, दोघेजण गंभीर ‘स्टेअरिंग लॉक’ झाल्याने उलटला बालरथ

Advertisement

कुंकळ्ळी : कुंकळ्ळी युनायटेड हायस्कूलच्या बालरथाला बाळ्ळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ अपघात होऊन 22 विद्यार्थी जखमी झाले. सुदैवाने या अपघाताला मोठ्या दुर्घटनेचे स्वरुप मिळाले नाही. हा अपघात सकाळी 7.30 च्या दरम्यान झाला. सर्व विद्यार्थ्यांना लगेच जवळच्या बाळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले तसेच काहींना प्राथमिक उपचारांनंतर मडगावातील जिल्हा  इस्पितळात हलविण्यात आल्याची माहिती आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी दिली. या अपघातात दोन विद्यार्थी सोडल्यास इतर विद्यार्थ्यांना हात, पाय, खांदा तसेच तोंडावर किरकोळ जखमा झालेल्या आहेत. सदर बस विद्यार्थ्यांना घेऊन सकाळी 7.15 च्या दरम्यान बेंदुर्डे येथून कुंकळ्ळीला निघाली होती. बाळ्ळी  येथे आरोग्य केंद्राजवळ पोहोचताच अचानक बसचे स्टेअरिंग ‘लॉक’ झाल्याने बस सरळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोलगट जागेत उलटली.

त्याचवेळी तिथे पोहोचलेल्यांनी व जवळच्या लोकांनी धाव घेऊन मुलांना बाहेर काढून जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. बाळ्ळी आरोग्य केंद्राजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला वीजखांब असून या खांबाला किंचित घासून जाऊन सदर बस जवळच झुडपावर आदळली आणि खोलगट भागात कोसळली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. कुंकळ्ळी पोलीस स्टेशनचे निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल विनोद काणकोणकर पुढील तपास करत आहेत. या अपघाताची माहिती मिळताच माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, केपेचे मामलेदार प्रताप गावकर यांनी धाव घेऊन जखमी झालेल्या मुलांची विचारपूस केली. तीन मुलांना इस्पितळात दाखल करून घेण्यात आले असून बाकीच्यांना उपचारांनंतर घरी पाठविले जाईल, असे जिल्हा इस्पितळाचे पीआरओ शरीफ शेख यांनी सांगितले.

Advertisement

बालरथ अपघाताच्या चौकशीचा आदेश : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

बाळ्ळी येथील बालरथला झालेला अपघात हा दुर्दैवी आहे. या अपघाताची सखोल चौकशी करावी, यासाठी शिक्षण खाते व वाहतूक खात्याला आदेश देण्यात आले आहेत. बालरथांच्या देखभालीकडे, दुऊस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळा व्यवस्थापनावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. सरकारी शाळांबरोबरच खासगी शाळा व्यवस्थापनाला बालरथांसाठी विशेष देखभाल व दुऊस्तीसाठी अतिरिक्त निधी दिला जातो. तरीही काही शाळा बालरथांच्या दुऊस्तीकडे दुर्लक्ष करतात. या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत. या घटनेत 14 विद्यार्थी जखमी झाले असून पाच मुलांना गंभीर इजा झाल्याचे समजते. अनुदान देऊनही असे अपघात होत असतील तर संबंधित शाळा व्यवस्थापनावर कारवाईशिवाय पर्याय नाही. काही शाळा बालरथांच्या देखभालीसाठी व दुऊस्तीसाठी दिलेल्या अनुदानाचा वापर करीत नाहीत, असे निदर्शनास आलेले आहे. जुन्या बालरथ बसेस बदलण्यासाठी काही दिवसांतच सरकार योग्य तोडगा काढेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

धोकादायक रस्त्यांच्या बाजूला ‘क्रॅश बॅरियर्स’ उभारा : गोवा फॉरवर्डची मागणी

बाळ्ळी येथे गुरुवारी बालरथाला जो अपघात झाला तो रस्त्याच्या बाजूला कुठल्याही प्रकारची संरक्षक यंत्रणा नसल्याने झाला असल्याचा दावा गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी केला आहे. या अपघातस्थळी जर क्रॅश बॅरियर्स असते, तर ही बस खाली पडलीच नसती, असा दावाही त्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील सर्व अशा धोकादायक रस्त्यांचे ताबडतोब ऑडिट हाती घ्यावे आणि ज्या ठिकाणी गरज असेल तेथे क्रॅश बॅरियर्स उभारावेत, अशी मागणी केली आहे. दुर्गादास कामत यांच्यासह गोवा फॉरवर्डचे ज्येष्ठ पदाधिकारी मोहनदास लोलयेकर आणि विकास भगत यांनी गुरुवारी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाला भेट देऊन तेथे उपचार चालू असलेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कामत म्हणाले की, मागच्या विधानसभा अधिवेशनात वाहतूक खात्याच्या मागण्यांवर चर्चा करताना गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी गोव्यातील सर्व रस्त्यांच्या बाजूला क्रॅश बॅरियर्स उभारण्याची सूचना केली होती. ही सूचना मान्य करून, जर हा उपाय राबवला असता, तर गुरुवारचा अपघात झालाच नसता. बस जरी नियंत्रणाच्या बाहेर गेली असली, तरी बॅरियर्स असल्यास ती उलटली नसती, असे कामत म्हणाले. सध्या सार्वजनिक बांधकाम खाते मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे आहे. त्यांनी आता तरी या मागणीकडे गांभीर्याने पाहावे, असे ते म्हणाले. दरम्यान, विकास भगत यांनी गोव्यातील शाळांना जे बालरथ दिले जातात त्यांची देखभाल कोण आणि कशी करतो याचेही ऑडिट होण्याची गरज व्यक्त केली. या बालरथांची व्यवस्थित देखभाल होत नाही. त्यामुळेच असे अपघात घडतात, असा आरोप त्यांनी केला. याबाबतीतही सरकारने गांभीर्य दाखवायला हवे, असे ते म्हणाले. दरम्यान, नावेलीचे आमदार व कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनीही या अपघाताची माहिती मिळताच दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाला भेट देऊन तेथे उपचार घेणाऱ्या विद्यार्थ्यांची विचारपूस केली.

Advertisement
Tags :

.