महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोल्हापूरकरांचा समतोल मताचा टक्का

12:58 PM Nov 22, 2024 IST | Pooja Marathe
Balanced vote share of Kolhapur residents
Advertisement

कुणाच्या पथ्यावर..?

Advertisement

धक्कादायक निकालाची शक्यता; दोन पासून दहा हजारांपर्यंतच राहील मताधिक्य

Advertisement

कोल्हापूर /संतोष पाटील

कोल्हापूर जिह्यात मागील निवडणुकीत 74.45 तर यंदा 76.25 टक्के मतदान झाले. अगदी 1.20 टक्के मतदान वाढले असले तरी मतदारांची एकूण संख्या 2 लाख 894 वाढली. कोल्हापूरकरांचा समतोल मतांचा आकडा कुणाच्या पथ्यावर पडला, हे पाहणे उत्सुकतेचं ठरेल. अतितटीच्या लढतीत धक्कादायक निकालाची शक्यता असून कोल्हापूर उत्तर, कागल, शिरोळ, राधानगरी, चंदगड येथे आश्चर्यकारक निकाल लागू शकतो. कोल्हापुरात दहाही जागांचा निकाल दोन ते दहा हजारांच्या आसपास राहण्याच्या शक्यतेनं कमालीची उत्सुकता आणि हुरहूर निकालाने वाढवलेली आहे.

कोल्हापूर उत्तर
कोल्हपूर उत्तर मतदारसंघामध्ये 2 लाख 83 हजार 480 पैकी 1 लाख 72 हजार 168 म्हणजे 60.7 टक्के मतदान झाले. यावर्षी 3 लाख 1743 मतदानापैकी 1 लाख 97 हजार 672 मतदान झाले. साधारण 18 हजार 263 मतदारांची संख्या वाढून मतदानाची टक्केवारी साधारण 4 टक्के वाढली. कसबा बावडा, लाईन बझार, कदमवाडी, जाधववाडी, भोसलेवाडी, रुईकर कॉलनी, महाडिक वसाहत, विचारेमाळ, सदर बझार, कारंडे मळा आदी परिसर राजेश लाटकर यांच्या बाजूने कौल देतील, असा दावा केला जात आहे. राजारामपुरी, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, ताराबाई पार्क, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी आदी परिसर राजेश क्षीरसागर यांच्या पाठीशी राहील, असे मानले जाते. शहराची विभागणी पूर्व आणि पश्चिम अशी झाल्याने या परिसरातील मतदान निर्णायक ठरणार आहे.
काँग्रेस आणि शिवसेनेच्या काटेजोड लढतीमध्ये विजयाचा अंदाज बांधणे कठीण असले तरी विजयी उमेदवाराचे मताधिक्य पाच-सात हजारांपेक्षा अधिक असणार नाही. तुलनात्मदृष्ट्या 18 हजार 263 मतदार वाढले तर 25 हजार 599 जादाचे मतदान झाले. 2019 च्या दुरंगी लढतीच्या निवडणुकीत शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांना 75 हजार 500 मते मिळाली तर काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना 90 हजार 460 मते मिळाली होती.

कोल्हापूर दक्षिण
शहरातील 26 प्रभाग आणि करवीर तालुक्यातील 36 गावांचा समावेश असलेल्या कोल्हापूर दक्षिणमध्ये 2019च्या निवडणुकीत 3 लाख 22 हजार 646 मतदारांपैकी 2 लाख 41 हजार 706 मतदारांनी म्हणजे 74.9 टक्के मतदान झाले होते. 2024 ला 3 लाख 72 हजार 684 पैकी 2 लाख 79 हजार 300 मतदारांनी मतदान केले. एकूण मतदानाच्या 74.97 टक्के इतके आहे. तसेच 50 हजार मतदार वाढले असून मतदानाचा टक्का सारखाच आहे. काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील आणि भाजपचे माजी आमदार अमल महाडिक या पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्ध्यांत लढाई झाली. उंचगाव, पाचगाव आणि शहरातील 26 प्रभागात बाजी मारणारा दक्षिणच्या गादीवर बसणार आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांना 1 लाख 39 हजार 64 तर भाजपचे अमल महाडिक यांना 96 हजार 816 मते मिळाली होती.

करवीर
मागील निवडणुकीत 3 लाख दोन हजार 659 एकूण मतदानांपैकी 2 लाख 55 हजार 129 मतदान झाले, 84.3 टक्के इतके होते. यावर्षी 3 लाख 25 हजार 161 पैकी 2 लाख 75 हजार 704 मतदारांनी मतदान केले. यंदा 22 हजार 502 मतदान वाढले. 84.79 टक्के मतदान झाले. करवीर, गगनबावडा आणि पन्हाळा तालुक्यातील काही गावांचा असलेला हा मतदारसंघात शिंदे शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके आणि काँग्रेसचे राहुल पाटील यांच्यात काटे की टक्कर झाली. करवीर पश्चिम भागात चंद्रदीप नरके तर पूर्व भागात राहुल पाटील यांचा जोर दिसला. वडणगे, शिये, भुये, आंबेवाडी आदी शिवसेना (ठाकरे) गटाचे अस्तित्व आणि सहानुभूती तर कुंभी कारखान्याचे राजकारण कुणाच्या पथ्यावर पडणार, यावरुन काठावरच्या बहुमताने करवीरचा आमदार निवडून येइल. मागील वेळी काँग्रेसचे पी. एन. पाटील यांना 1 लाख 34 हजार 790 तर शिवसेना चंद्रदीप नरके यांना 1 लाख 12 हजार 198 मते मिळाली होती.

कागल
कागलमध्ये राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे समरजित घाटगे यांच्यात काठावरची लढत आहे. कागलचा निकाल पाच हजारांच्या आसपास लागणार आहे. माजी खासदार प्रा.संजय मंडलिक गटाची कथित नाराजी आणि दोन्ही घाटगे गटातील समन्वय यावर विजयाचे पारडे फिरणार आहे. मागील तीन निवडणुकांत तिरंगी लढतीचा फायदा मुश्रीफ यांना झाला होता. यंदा अतितटीची दुरंगी लढत होत आहे. 2019 च्या निवडणुकीत 81.42 मतदान झाले होते. 3 लाख 23 हजार 27 मतदार होते यापैकी 2 लाख 62 हजार 473 मतदान झाले. 2024 ला 3 लाख 43 हजार 672 मतदारा पैकी 81.72 टक्के म्हणजेच 2 लाख 80 हजार 849 मतदारांनी मतदान केले. 20 हजार 645 मतदार वाढले. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांना 1 लाख 15 हजार 438 तर अपक्ष समरजित घाटगे यांनी 87 हजार 765 मते घेतली होती. शिवसेनेचे संजय घाटगे यांना 55 हजार 70 असे निर्णायक मतदान झाले होते.

राधानगरी
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सभेनंतर राधानगरी मतदारसंघात ठाकरे सेनेचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात जोरदार मुसंडी मारली. मागील पाच वर्षात विशेषत: शिंदे सरकारच्या काळात केलेली विकासकामे आणि माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांचे पाठबळ हे आबिटकर यांचे प्लस पॉईंट आहेत. बिद्री कारखान्याची सत्ता आणि राधानगरीतील काँग्रेसचा एकगठ्ठा मतदान आणि आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या जोडण्या के. पी. पाटील यांच्यासाठी मैलाचा दगड ठरु शकतात. ए. वाय. पाटील कुणाचे आणि किती मते खाणार, हाही मुद्दा महत्वाचा ठरणार आहे.
2019च्या निवडणुकीत 3 लाख 27 हजार 346 मतदारांपैकी 2 लाख 45 हजार 378 म्हणजे 75 टक्के मतदान झाले होते. 2024 ला 3 लाख 44 हजार 422 पैकी दोन लाख 69 हजार 545 मतदान झाले. याची आकडेवारी 78.26 इतकी आहे. तुलनेत 17 हजार 76 मतदार वाढले तर 24 हजार 35 मतदानाची आकडेवारी वाढली आहे. मागीलवेळी शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांना 1 लाख 4 हजार 845 तर राष्ट्रवादीचे के. पी. पाटील यांना 86 हजार 566 मत मिळाली होती.

शाहूवाडी-पन्हाळा
शाहूवाडीमध्ये आमदार विनय कोरे आणि माजी आमदार सत्यजित पाटील यांच्यात अतितटीची लढत आहे. आतापर्यंत या दोघांतील लढतीमध्ये पाच हजारांपेक्षा कमी मताधिक्य राहिले आहे. दोन्ही गटांचे मतदार ठरलेले आहेत. एकमेकांच्या बालेकिल्ल्यात पाडलेलं भगदाड विजयाचे गणित ठरवेल. शाहूवाडीत आमदार विनय कोरे आणि पन्हाळ्यात सत्यजित पाटील किती मते घेणार, यावरच दोघांपैकी विधानसभेत कोण जाणार, हे ठरणार आहे. 2019 ला 2 लाख 88 हजार 487 मतदारांपैकी 2 लाख 30 हजार 501 मतदान झाले. याचे प्रमाण 89.90 टक्के होते. 2024 ला 3 लाख 6 हजार 246 मतदारांपैकी 2 लाख 42 हजार 57 मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी 79.04 इतकी आहे. यंदाच्या निवडणुकीत 17 हजार 759 मतदार वाढले तर मतदान 11 हजार 556 मतदान वाढले. मागील निवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांना 1 लाख 23 हजार 973 तर शिवसेनेच्या सत्यजित पाटील यांना 96 हजार 274 मते मिळाली.

चंदगड
राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार राजेश पाटील यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांची कन्या डॉ. नंदाताई बाभुळकर यांच्यासह भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील यांच्यात प्रमुख लढत झाली. यासह अप्पी पाटील, मानसिंग खोराटे आदी दिग्गज रिंगणात होते. गटातटाच्या राजकारणात मतविभागणीवर यशाचे गणित अवलंबून आहे. 2019 च्या निवडणुकीत 3 लाख 21 हजार 319 मतदारांपैकी 2 लाख 18 हजार 818 म्हणजे 68.10 टक्के मतदान झाले. यंदा 3 लाख 27 हजार 680 मतदारांपैकी 2 लाख 44 हजार 482 मतदारांनी मतदान केले. 74.61 टक्के मतदान झाले. चंदगडमध्ये 6 हजार 361 मतदार वाढले तर 25 हजार 664 इतक्या मोठ्या संख्येने तुलनेत मतदान अधिक झाले आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे राजेश पाटील यांना 54 हजार 851 तर भाजपचे शिवजी पाटील यांना 50 हजार 920 मते पडली. वंचित बहुजन आघाडीचे अप्पी पाटील यांना 43 हजार 839 तर संग्राम कुपेकर यांना 32 हजार 882 आणि जनसुराज्य शक्तीचे अशोक चराटी यांनी 12 हजार मते घेतली होती.

हातकणंगले
राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार राजू आवळे, जनुसराज्य पक्षाचे अशोकराव माने यांच्यात प्रमुख लढत असलेल्या हातकणंगलेत अतितटीची लढत मानली जाते. काँग्रेस-शिवसेना आणि जनसुराज्यचा बालेकिल्ला असलेल्या राखीव मतदारसंघ लक्षवेधी ठरत आहे. महाडिक गट, सतेज पाटील गट, माजी आमदार राजीव आवळे आणि सुजित मिणचेकर यांच्या गटाची भुमिका निर्णायक राहणार आहे. 2019 ला 3 लाख 20 हजार 110 पैकी 2 लाख 31 हजार 110 मतदारांनी 72.20 टक्के मतदान झाले. 2024 ला 3 लाख 41 हजार 685 मतदारांपैकी 75.5 टक्के म्हणजे 2 लाख 57 हजार 972 मतदारांनी मतदान केले. यंदा 21 हजार 575 मतदार वाढले तर 26 हजार 853 मतदान जादाचे झाले. मागील निवडणुकीत काँग्रेसचे राजू आवळे यांना 73 हजार 328 तर शिवसेनेचे सुजित मिणचेकर यांना 66 हजार 518 मते मिळाली. जनसुराज्यचे अशोक माने यांनी 44 हजार 391 मते घेतली होती.

इचलकरंजी
लोकसभा निवडणुकीत हिंदुत्वाच्या लाटेवर स्वार झालेल्या इचलकरंजी मतदारसंघात अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे भाजपकडून रिंगणात होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मदन कारंडे यांनी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक रंगतदार वळणार आणली आहे. राष्ट्रवादीची मोठी व्होटबँक असलेल्या या परिसरात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या इचलकरंजीतील सभेचा करिष्मा मतपेटीपर्यंत गेल्यास येथील लढत आश्चर्यकारक वळणावर येऊ शकते. 2019 ला 2 लाख 93 हजार 59 पैकी 68.20 टक्के मतदारांनी म्हणजेच 1 लाख 99 हजार 866 मतदारांनी मतदान केले होते. 2024 ला 3 लाख 12 हजार 664 मतदारांपैकी 68.95 टक्के मतदान होऊन 2 लाख 15 हजार 582 मतदारांनी मतदान केले. तुलनेत 19 हजार 605 मतदार वाढले तर 15 हजार 716 मतदान वाढीव झाले. अपक्ष प्रकाश आवाडे यांनी 1 लाख 16 हजार 523 तर भाजपचे सुरेश हाळवणकर यांना 66 हजार 863 मते मिळाली होती.

शिरोळ
शिरोळमध्ये महायुतीकडून अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि काँग्रेसचे गणपतराव पाटील यांच्यात प्रमुख लढत झाली. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार उल्हास पाटील यांची स्वाभिमानी घरवापसीने रंगत वाढली. आमदार सतेज पाटील यांनी संपूर्ण राजकीय ताकद गणपतराव पाटील यांच्यामागे उभी केली होती. मागील अडीच वर्षातील काम आणि थेट संपर्क हे राजेंद्र पाटील यांच्यासाठी उपयोगी ठरले. माजी आमदार दिवंगत सा. रे. पाटील यांनी बांधणी केलेलं कार्यकर्ते आणि दत्त कारखाना कार्यक्षेत्रातील काम गणपतराव पाटील यांची राजकीय वाट प्रशस्त करणारे ठरले. जैन, लिंगायत, हिंदू आणि मुस्लिम अशी मतांची वरवर झालेली विभागणी निर्णायक ठरणारी आहे.

2019 ला 3 लाख 13 हजार 71 मतदारांपैकी 74.40 टक्केवारीने 2 लाख 32 हजार 925 मतदान झाले. 2024 ला 3 लाख 29 हजार 141 मतदारांपैकी 78.06 टक्केवारीने 2 लाख 56 हजार 927 मतदान झाले. तुलनेत 16 हजार 70 मतदार तर 24 हजार 3 मतदानाची संख्या वाढली. मागील निवडणुकीत अपक्ष राजेंद्र पाटील यांना 89 हजार 550 तर शिवसेनेचे उल्हास पाटील यांना 61 हजार 743 मते मिळाली. स्वाभिमानीचे सावकार मादनाईक यांनी 51 हजार 538 मते घेतली होती.

मागील निवडणुकीची तुलना
जिह्यात 2019 ला 30 लाख 95 हजार 204 मतदार होते. त्यापैकी 73.90 टक्केवारीने 22 लाख 90 हजार 236 मतदारांनी मतदान केले. 2024 च्या निवडणुकीत 33 लाख 5 हजार 98 मतदारांपैकी 76.14 टक्केवारीने 25 लाख 20 हजार 116 मतदारांनी मतदान केले. 2019 आणि 2024 तुलना केल्यास, 2 लाख 9 हजार 894 मतदारांची संख्या वाढली. तर 2.24 टक्के मतदान वाढून 2 लाख 29 हजार 880 मतदान करणाऱ्यांची संख्या या निवडणुकीत वाढली.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article