चाकूर पंचायत समितीतील भ्रष्टाचाराची एसआयटी चौकशी करा, अन्यथा ६ जुलैपासून उपोषण
त. भा. संवाद प्रतिनिधी, चाकूर
चाकूर पंचायत समिती अंतर्गत २०१५ ते २०२६ या कालावधीत विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील-चाकूरकर यांनी केला असून या सर्व प्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत न्याय चौकशी करण्यात यावी, अन्यथा ६ जुलैपासून चाकूर शहराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उपोषण सुरू करण्याचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
चाकूर पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात ७० ग्रामपंचायती व ८४ गावांचा समावेश असून शासकीय विहिरी, शेततळे, गोठे, शौचालये, पाणंद रस्ते, जलजीवन मिशन आणि मनरेगा अंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या सर्व कामांची सन २०१५ ते २०२६ पर्यंतची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व शासनाच्या निधीची वसुली करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
बालाजी पाटील-चाकूरकर यांच्या म्हणण्यानुसार, अनेक शासकीय विहिरींचे अनुदान अपात्र लाभार्थ्यांनी घेतले असून मोठ्या प्रमाणात शौचालये व गोठे केवळ कागदोपत्री असल्याचा आरोप आहे. पाणंद रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची असून जलजीवन मिशनमध्येही कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचा संशय असल्याचे त्यांनी नमूद केले.
मनरेगा अंतर्गत झालेल्या सर्व कामांची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी करताना त्यांनी चाकूर तालुक्यातील अनेक शेतकरी व लाभार्थी आपल्याशी संपर्क साधून तक्रारी करीत असल्याचा दावा केला. कलकोटी, अजनसोंडा, बाबलगाव आदी गावांतील नागरिकांनी यापूर्वी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन केले असून या संदर्भातील पत्रव्यवहार विभागीय आयुक्त स्तरापर्यंत झाल्याचे त्यांनी सांगितले.