ठाकरे सेनेचे बाळा गावडे शिंदे शिवसेनेत
सावंतवाडी | प्रतिनिधी
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा समन्वयक , जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्यासह त्यांचे सुपुत्र युवा सेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख ॲड. कौस्तुभ गावडे , उपतालुकाप्रमुख विष्णू उर्फ आबा सावंत, संतोष गोवेकर यांच्यासह सुमारे 400 जणांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या कार्यपद्धतीमुळे शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे असे बाळा गावडे यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत जेवढे आमदार झाले त्यापेक्षा सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर आहेत. ते चौथ्यांदा निवडून येणारच आहेत. मात्र, त्यांना पन्नास हजाराहून अधिक मताधिक्य मिळवून देण्यात आमचा वाटा असेलअसे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर ,माजी आमदार शंकर कांबळी , शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी आदी उपस्थित होते. मंत्री दीपक केसरकर म्हणाले श्री गावडे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्षात एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यांचा सन्मान राखला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार शंकर कांबळी यांनी एका सच्चा नेतृत्वाच्या छायेखाली श्री गावडे यांनी आज प्रवेश केला आहे त्याबद्दल खरंच आनंद होत आहे असे स्पष्ट केले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी कारिवडे येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.