बालगंधर्व उरले फक्त मिटींग आणि मेळाव्यासाठी
मिरज :
मराठी नाट्याक्षेत्राला क्षितीजापार पोहचविणारे नटसम्राट नारायण राजहंस तथा बालगंधर्व यांनी आपल्या कारकिर्दीतील पहिल्या नाट्या प्रयोगाने पावन केलेल्या शहरातील बालगंधर्व नाट्यागृहाची सध्या दूरवस्था झाली आहे.
गादीच्या खुर्च्या आणि पायाखालचा मलमली गालीचा बसवून केवळ रंगरंगोटी करण्यात महापालिका प्रशासन धन्यता मानते. मात्र, कलाकारांना वास्तव्यासाठी कोणत्याही सुसज्ज सुविधा नाहीत. त्यामुळे मोठ्या नाटक कंपन्या आता मिरजेत नाट्याप्रयोगासाठी येत नाहीत. त्यामुळे केवळ चार हजार ऊपयांच्या भाडेतत्त्वावर शाळांच्या वार्षिक स्नेहसंमेलनासह विविध संघटनांच्या मिटींगसाठी बालगंधर्वचा वापर सुरू आहे.
बालगंधर्वांची 58 वी पुण्यतिथी झाली. या कार्यक्रमात स्थानिक रंगकर्मींनी बालगंधर्व नाट्यागृहाच्या दूरवस्थेबाबत महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. बालगंधर्वांच्या नावाच्या स्मृती जपण्यासाठी कोट्यावधी ऊपये खर्चून नाट्यागृह उभारले. मात्र, सेवा सुविधा देण्यात महापालिका कमी पडली. स्थानिक कलाकार संघटनांसह रंगकर्मींनी वारंवार पाठपुरावा कऊनही दुर्लक्ष केले गेले. परिणामी मोठ्या नाटकांचे प्रयोग बंद झाल्याने बालगंधर्व नाट्यागृह केवळ शोभेची इमारत बनली आहे. बालगंधर्वांना अभिवादन करण्यासाठी अधिकारी येतात. पण नाट्यागृह पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत, अशी तक्रार रंगकर्मींनी केली.
- बालगंधर्वांनी सादर केले पहिले नाटक
स्वत: नटसम्राट बालगंधर्व यांनी आपल्या कारकिर्दीतले पहिले नाटक या ठिकाणी केले होते. त्यामुळे या नाट्यागृहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या नाट्यागृहात स्वच्छता आणि प्रयोग करण्यासाठी लागणाऱ्या साधनांची कमतरता आहे. वस्तूंची मोडतोड झाल्याने कलाकारांची आणि नाटक संस्थांची गैरसोय होत आहे. अनेकदा खर्च करूनही नाट्यागृह सुस्थितीत नाही. वातानुकूलित यंत्रणा बंद आहे. खुर्च्यांची मोडतोड झाली आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्वच्छता गृहामध्ये कमोड नाही. यामुळे व्यावसायिक नाटक कंपन्यांनी मिरजेच्या नाट्यागृहाकडे पाठ फिरवली आहे.
सदरचे नाट्यागृह दुऊस्त व्हावे. तेथील गैरसोयी दूर व्हाव्यात. हौशी कलाकार आणि संस्थांना सरावासाठी आणि रंगीत तालिम करण्यासाठी नाट्यागृह मोफत उपलब्ध व्हावे. याबरोबर इतर मागण्यांचे निवेदन भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष ओमकार शुक्ल यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. महानगरपालिकेने लक्ष घालून नाट्यागृह बाबतीत निर्णय न घेतल्यास सर्व कलाकार आणि संस्थांना सोबत घेऊन आंदोलनाचा इशारा यावेळी दिला. प्रशांत गोखले, मनोज यादव, धीरज पलसे, कविता घारे, आकांक्षा जोशी, दिगंबर कुलकर्णी, विवेक गोखले, चैतन्य तांबोळकर, श्रीराम कुलकर्णी, सुरज कांबळे, विनायक इंगळे, अश्विनी गोखले नवरे, निलेश साठे उपस्थित होते.