शहरात बकरी ईद उत्साहात
अंजुमन-ए-इस्लामच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण
प्रतिनिधी/ बेळगाव
मुस्लीम धर्मियांच्या सर्वात मोठ्या सणांपैकी एक असलेला बकरी ईद शनिवारी शहर व उपनगरांमध्ये उत्साहात साजरा झाला. कोर्ट येथील ईदगाह मैदान परिसरात सामूहिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने मुस्लीम धर्मीय उपस्थित होते. बेळगाव शहरासह अनगोळ, वडगाव, शहापूर, गांधीनगर, अमननगर परिसरात बकरी ईदचा उत्साह दिसून आला.
बकरी ईदची तयारी मागील अनेक दिवसांपासून सुरू होती. शनिवारी सकाळी अंजुमन-ए-इस्लामच्या ईदगाह मैदानावर मुस्लीम धर्मियांची गर्दी जमू लागली. टप्प्याटप्प्याने धर्मगुरुंच्या मार्गदर्शनाने नमाज पठण करण्यात आले. या कार्यक्रमाला बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांसह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आमदार असिफ सेठ यांनी मुस्लीम धर्मियांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. हा बलिदानाचा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शांततेत बकरी ईद साजरी करण्याची सूचना केली. बकरी ईदच्या निमित्ताने अनेक ठिकाणी मेजवाण्या आयोजित करण्यात आल्या होत्या. परंपरेप्रमाणे कुर्बानी देण्यात आली. डोक्यावर चंद्र असलेल्या बकऱ्यांना मोठी किंमत देऊन खरेदी करण्यात आली. यामुळे बकऱ्यांच्या किमतीवरून चर्चा रंगत होती.
शहरासोबत उपनगरातील रस्तेही मुस्लीम धर्मियांनी फुलले होते. वडगाव जेल शाळेसमोरील मैदानावर नमाज पठण करण्यात आले. त्याचबरोबर शहराच्या इतर भागातही सामूहिक नमाज पठण करण्यासाठी गर्दी झाली होती. एकमेकांना शुभेच्छा देऊन हा सण साजरा करण्यात आला.