बजरंग पुनिया पुन्हा पद्मश्री स्वीकारणार; कुस्ती महासंघ बरखास्तीनंतर पुनियाचा निर्णय
क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाला बरखास्त केल्यांनतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच परत केलेला पद्मश्री पुरस्कार पुन्हा स्वीकारणार असल्याचे त्याने सांगितले आहे.नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले होते. बऱ्याच कुस्तीपट्टूनी याला जोरदार विरोध केला होता. बजरंग पुनियाने देखील भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पद्मश्री पुरस्कार परत केला होता.पण कुस्ती संघटनेच्या निलंबनानंतर बजरंगने हा सन्मान परत घेणार असल्याचे सांगितले.
बजरंग म्हणाला, हा योग्य निर्णय आहे. आमच्या बहिणींवर आणि मुलींवर अत्याचार करणाऱ्या लोकांना पूर्णपणे हटवले पाहिजे. आमच्यावर अनेक आरोप झाले. आमच्याविरुद्ध राजकारण केले गेले. जेव्हा आपण पदके जिंकतो तेव्हा आपण देशाचे असतो. आम्ही खेळाडू कधीच भेदभाव करत नाही. आम्ही एकाच थाळीत एकत्र जेवतो.” बजरंग पुढे म्हणाला, “आम्ही आमच्या तिरंग्यासाठी रक्त आणि घाम गाळला आहे. सैनिक आणि खेळाडूंपेक्षा कोणीही कठोर परिश्रम करत नाही. आम्हाला देशद्रोही म्हटले गेले. आम्ही कधीच देशद्रोही नव्हतो. आम्ही बक्षीस जिंकून मिळवले. आम्ही ते परत घेऊ शकतो. आम्ही सन्मान परत घेऊ. साक्षी निवृत्ती मागे घेईल की नाही याबाबत आत्ताच काही सांगू शकत नाही'.