बजरंग पुनियाने पद्म पुरस्कार केला परत! कुस्तीगीर परिषद निवडणुकीच्या निषेधार्थ कृती
ब्रिज भूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंग यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या प्रमुखपदी निवड केल्याच्या निषेधार्थ कुस्तीपटू साक्षी मलिकने काल खेळातून साश्रु निरोप घेतला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिला कुस्तीपटू अत्याचार विरोधी आंदोलकाचा समर्थक आणि ऑलिंपीकवीर बजरंग पुनिया यांनी आज निवडणुकीचा निषेध करत आपले पद्म पुरस्कार सरकारला परत केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पैलवान बजरंग पुनिया यांनी पत्र लिहून आपला पद्मश्री पुरस्कार परत करत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी आपल्या एक्स या सोशलमिडीया अकाउंटवर पोस्ट लिहीताना, "मी माझा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परत करत आहे. माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याजवळ फक्त हे पत्र आहे. हेच माझे मत आहे."असे ट्विट केले आहे.
महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले ब्रिजभूषण सिंग यांचे निष्ठावंत संजय सिंग यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडणुकीमध्ये 15 पैकी 13 जागा जिंकल्या. या निवडणुकींच्या निकालानंतर लगेच पत्रकार परिषद घेऊन साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी निराशा व्यक्त केली.
तसेच या परिषदेमध्ये संजय सिंगच्या निवडीनंतर साक्षी मलिकने आपण आता खेळातून निवृत्त होत असल्याचे घोषित करून निषेध व्यक्त केला. आज दुसऱ्या दिवशी बजरंग पुनियाा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासाकडे गेले असता पोलीसांनी त्यांना आत जाण्यास मज्जाव केला. त्यावर बजरंग पुनिया यांनी आपला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या दारातच ठेऊन दिला आहे.