बजरंग दल गोव्यात करणार शक्तिप्रदर्शन
कुडचडे येथे 8 डिसेंबर रोजी शौर्ययात्रा : बजरंगी, हिंदुंची 15 हजारांची उपस्थिती
फोंडा : विश्व हिंदू परिषदेची शाखा असलेल्या बजरंग दलातर्फे येत्या 8 डिसेंबर रोजी कुडचडे येथे भव्य शौर्य यात्रेचे आयोजन केले आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी ढाचा पाडण्यात आला. त्यादिवशी गीता जयंती होती. हाच मुहूर्त साधून देशभर ही शौर्ययात्रा काढण्यात येणार असून गोव्यातही अशा प्रकारच्या यात्रेचे आयोजन केल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे गोवा प्रांतमंत्री मोहन आमशेकर यांनी फोंडा येथे पत्रकार परिषदेत दिली. सध्या गोव्यात व्यापार जिहाद, भूखंड जिहाद आणि लव्ह जिहाद सारखे प्रकार वाढत आहेत. हे प्रकार थोपविण्यासाठी गोव्यातील समस्त हिंदू बांधव तसेच अन्य धर्मीय मूळ गोमंतकीयांनी एकत्र येण्याचे आवाहन या शौर्ययात्रेच्या माध्यमातून केले जाणार आहे. कुडचडे येथील सरकारी प्राथमिक शाळेपासून दुपारी 3 वा. या यात्रेला सुऊवात होणार असून सायंकाळी 5 वा. नगरपालिकेसमोर खुल्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेला प्रमुख वक्ते म्हणून टायगर राजा सिंग हे उपस्थित राहणार आहेत. साधारण पाच हजार बजरंगी आपल्या पारंपरिक पोषाखात या यात्रेत सहभागी होणार आहेत. संघ परिवाराशी संबंधीत विविध शाखांचे स्वयंसेवक व अन्य नागरिक मिळून 15 हजार जनसमुदाय जाहीर सभेला उपस्थिती लावणार आहे, अशी माहिती मोहन आमशेकर यांनी दिली.
व्यापार जिहादी घुसखोरांना आवरा
गोव्यात सध्या व्यापार जिहाद व भूखंड जिहाद फोफावला आहे. गोव्याच्या विविध शहरातील फुटपाथ तसेच महामार्ग व बगलरस्त्यांच्या बाजूला परप्रांतीय घुसखोरांबरोबरच रोहिग्यांनी बस्थान मांडले आहे. कुठलाही व्यापारी कर न भरता हे विक्रेते बेकायदेशीरित्या फळे, फुले व अन्य सामानाची विक्री करताना दिसतात. काही मशिदींच्या आश्रयाखाली राहून हे घुसखोर गोव्यातील बाजारपेठेत घुसले आहेत. त्यांच्यामुळे गोमंतकीय व्यापारी अडचणीत आले असून हा पैसा देशविघातक कारवायांसाठी वापरला जात आहे. ग्रामपंचायती, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम खाते तसेच सरकारने अशा घुसखोर व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, यासंबंधीचे लेखी निवेदन येत्या काही दिवसांत बजरंग दलातर्फे सादर केले जाणार आहे. विशिष्ट मुदतीत ही कारवाई न झाल्यास बजरंग दल आपल्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करेल अशा इशारा मोहन आमशेकर यांनी दिला.
व्यापार जिहादाबरोबरच राज्यात भूखंड जिहादही विविध भागांमध्ये पाय पसरवित आहे. गोव्यातील मोठ्या जमिनी विकत घेऊन त्यांचे छोटे भूखंड पाडून परप्रांतीयांना विकले जात आहेत. वास्को, बाळ्ळी, कुंकळ्ळी, सत्तरी आदी भागांमध्ये असे प्रकार उघडकीस आले आहेत. हा प्रकार म्हणजे गोव्यात चाललेली एकप्रकारची घुसखोरीच आहे. या भूखंड जिहादला वेळीच आवर घालण्यासाठी गोमंतकीय जनतेने जागृत होण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी व अन्य संबंधीत अधिकाऱ्यांना याची कल्पना देण्यात आली आहे. मात्र गोवेकरांनी आपल्या जमिनी विकताना सतर्क राहण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आले. गोव्यात लव्ह जिहादचे प्रकारही सुरू होते. बजरंग दलाने त्यात गुंतलेल्या काही लोकांना हिसका दाखविल्यानंतर सध्या ते कमी झाल्याचे मोहन आमशेकर म्हणाले. विहिंपचे कोकण प्रांतमंत्री मोहन सालेकर, प्रमोद सांगोडकर, बजरंग दलाचे भूषण देसाई, डॉ. चंद्रकांत हिरेमठ व मातृशक्तीच्या सुजाता कामत हे यावेळी उपस्थित होते.