तरुणांच्या असंतोषाचे दर्शन!
देशातील शिक्षण व्यवस्था, भरती प्रक्रिया आणि वाढती बेरोजगारी या प्रश्नांनी गेल्या काही वर्षांत तरुणांच्या मनात मोठा असंतोष निर्माण केला आहे. अनेक स्पर्धा परीक्षा रद्द होणे, पेपरफुटीच्या घटना, भरती प्रक्रियेला होणारा विलंब आणि त्यातून निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे आयुष्य अक्षरश: टांगणीला लागले आहे. अशा पार्श्वभूमीवर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या नव्याने उदयास आलेल्या संघटनेने दिल्लीत केलेले आंदोलन केवळ एका मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी नसून, ते देशातील तरुणांच्या मनातील खोलवर दडलेल्या असंतोषाचे प्रतीक म्हणून पाहावे लागेल. या आंदोलनाची सुरुवात एका वक्तव्याच्या निषेधातून झाली. मात्र काही दिवसांतच ते शिक्षण व्यवस्था, रोजगार आणि उत्तरदायित्व या व्यापक प्रश्नांशी जोडले गेले. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेली ही चळवळ अल्पावधीत लाखो लोकांपर्यंत पोहोचली आणि जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या रूपाने प्रत्यक्ष रस्त्यावर उतरली. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, आजचा तरुण केवळ डिजिटल माध्यमांपुरता मर्यादित राहिलेला नाही, योग्य मुद्दा मिळाल्यास तो प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होण्यासही तयार आहे. आज देशातील लाखो तरुण स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी शोधत आहेत. परंतु वारंवार होणाऱ्या पेपरफुटी, न्यायालयीन वाद आणि प्रशासकीय ढिसाळपणामुळे त्यांचे मानसिक, आर्थिक आणि सामाजिक नुकसान होत आहे. अनेक कुटुंबे मुलांच्या शिक्षणासाठी मोठा खर्च करतात. वर्षानुवर्षे तयारी करूनही परीक्षा रद्द झाल्यास किंवा निकाल रखडल्यास त्याचा परिणाम केवळ विद्यार्थ्यावरच नाही, तर संपूर्ण कुटुंबावर होतो. त्यामुळे या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद हा कोणत्याही एका संघटनेच्या लोकप्रियतेपेक्षा लोकांच्या वास्तविक वेदनेचे प्रतिबिंब मानले पाहिजे. या आंदोलनाचे आणखी एक वैशिष्ट्या म्हणजे त्याची सामाजिक व्याप्ती. शिक्षणाचा प्रश्न हा कोणत्याही एका राज्याचा, जातीचा किंवा वर्गाचा प्रश्न नाही. तो प्रत्येक घराशी जोडलेला आहे. त्यामुळेच विविध स्तरांतील लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. रोजगार, शिक्षण आणि भविष्याची सुरक्षितता हे प्रश्न सार्वत्रिक असल्यामुळे अशा चळवळींना व्यापक स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता असते. तथापि, कोणत्याही आंदोलनाचे यश केवळ गर्दीवर अवलंबून नसते. त्यासाठी स्पष्ट नेतृत्व, ठोस कार्यक्रम आणि दीर्घकालीन दृष्टी आवश्यक असते. इतिहासात अनेक आंदोलने मोठ्या उत्साहाने सुरू झाली, पण संघटनात्मक मर्यादांमुळे कालांतराने त्यांची धार बोथट झाली. त्यामुळे सीजेपीसारख्या संघटनांसमोरही हेच आव्हान असेल. सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि प्रत्यक्ष राजकीय प्रभाव यामध्ये मोठा फरक असतो. आंदोलनातून निर्माण झालेली ऊर्जा सकारात्मक बदलासाठी वापरायची असेल, तर तिला संघटित आणि विधायक दिशा द्यावी लागेल. सरकारच्या भूमिकेचाही येथे विचार करणे आवश्यक आहे. लोकशाही व्यवस्थेत आंदोलन हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. आंदोलन दडपून टाकण्याऐवजी त्यामागील कारणे समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणे ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी असते. शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक करणे, परीक्षा प्रक्रियेला तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुरक्षित बनवणे, दोषींवर कठोर कारवाई करणे आणि भरती प्रक्रियेत निश्चित वेळापत्रक आणणे या उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज आहे. ते झाले नसल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली. आजचा प्रश्न केवळ एका मंत्र्याच्या राजीनाम्याचा नाही. प्रश्न आहे तो लाखो तरुणांच्या विश्वासाचा. जर तरुणांचा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला, तर त्याचे दूरगामी परिणाम देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासावर होऊ शकतात. त्यामुळे सरकार, प्रशासन आणि समाज या तिन्ही घटकांनी या असंतोषाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. विशेष करून ही सरकारची जबाबदारी आहे हे त्याचे समर्थन करणाऱ्यांनी सुद्धा सरकारला समजावले पाहिजे. अर्थात या समर्थक आणि सरकारमध्ये तरी समन्वय आहे का? हा प्रश्न वेगळाच. जंतर-मंतरवरील हे आंदोलन कदाचित एका दिवसात संपले असेल, परंतु त्याने उपस्थित केलेले प्रश्न अद्याप कायम आहेत. जोपर्यंत शिक्षण आणि रोजगार व्यवस्थेतील त्रुटी दूर होत नाहीत, तोपर्यंत अशा आंदोलनांची गरज आणि प्रासंगिकता कायम राहणार आहे. लोकशाहीत जनआवाजाकडे दुर्लक्ष करण्याची किंमत कोणत्याही व्यवस्थेला परवडणारी नसते, हेच या आंदोलनाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.