बजाज फ्रीडम 125 नंतर आणखी एक सीएनजी दुचाकी आणणार
पुढील वर्षी इथेनॉलवर चालणाऱ्या दुचाकी व तीनचाकी सादर करणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दुचाकी आणि तीनचाकी वाहन उत्पादक कंपनी बजाज ऑटो लवकरच भारतीय बाजारपेठेत आणखी एक सीएनजी बाइक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. शिवाय, कंपनी इथेनॉलवर चालणाऱ्या बाईक आणि तीनचाकी वाहने सादर करण्याचा विचार करत आहे, ज्या पुढील वर्षी लॉन्च केल्या जातील. कंपनी आर्थिक वर्ष 2025 मध्ये परवडणारी आणि प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याचा विचार करत आहे.
नवीन चेतक प्लॅटफॉर्म पुढील वर्षाच्या सुरुवातीला येण्याची अपेक्षा आहे. बजाजने अलीकडेच जगातील पहिली सीएनजी बाईक फ्रीडम 125 लाँच केली. आतापर्यंत 2000 सीएनजी बाईक वितरित केल्या आहेत. कंपनीचे सीईओ राजीव बजाज यांनी सांगितले की, कंपनी लवकरच दुसरी सीएनजी मोटरसायकल सादर करणार आहे. आम्ही या सणासुदीपर्यंत 1 लाख स्वच्छ ऊर्जा वाहनांची मासिक विक्री आणि उत्पादन गाठण्याच्या प्रयत्नात असणार आहोत.
ते पुढे म्हणाले की, कंपनीला ऑगस्टमध्ये 8,000 ते 9,000 बजाज फ्रीडम 125 डिलिव्हरी अपेक्षित आहे आणि पुढील वर्षी जानेवारीपर्यंत ते दरमहा 40,000 पर्यंत पोहोचेल. लॉन्च झाल्यापासून, कंपनीने आतापर्यंत 2,000 सीएनजी बाईक वितरित केल्या आहेत.