बजाज ऑटोची नवी इलेक्ट्रिक स्कूटर चेतक 2901 लाँच
किंमत 96 हजाराच्या घरात : 123 किलोमीटरचे देणार मायलेज
वृत्तसंस्था/ पुणे
इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात बजाज ऑटोसारख्या मोठ्या कंपन्या उतरल्यामुळे स्पर्धा अधिक वाढलेली पाहायला मिळाली आहे. बजाज ऑटो कंपनीने आपली नवी इलेक्ट्रिक स्कूटर चेतक 2901 ही नुकतीच बाजारात दाखल केली आहे. सदरच्या गाडीची किंमत इतर मॉडेलच्या तुलनेमध्ये कमी ठेवण्यात आली आहे.
लाखापेक्षा कमी किंमतीच्या दुचाकी मागणीत
गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांनी कमी किमतीच्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दाखल केल्या आहेत. 1 लाखावरील दुचाकींबाबत ग्राहकांमध्ये निरुत्साह असल्याचे वातावरण दिसून येत होते. दुचाकी कंपन्यांचा भर आता भविष्य काळामध्ये एक लाख रुपयापेक्षा कमी किमतीच्या स्कूटर्स बाजारात आणण्याकडे असणार आहे. या गटातील दुचाकींचा वाटा बाजारामध्ये वाढला असल्याकारणाने विविध कंपन्यांनी एक लाखापेक्षा कमी किमतीच्या गाड्या सादर करणे यावरच जास्त लक्ष केंद्रित केले आहे. परवडणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरचा वाटा पाहिल्यास 80 टक्के वाटा हा मोठ्या कंपन्यांनी उचललेला आहे.
अशी आहे नवी चेतक 2901
बजाज ऑटोची नवी चेतक 2901 या गाडीची सुरुवातीची किंमत 95 हजार 998 रुपये इतकी असणार आहे. यामध्ये 2.8 किलो वॅटची बॅटरी असणार आहे. प्रति तासाला 63 किलोमीटर इतका वेग घेणारी ही स्कूटर 123 किलोमीटर इतके अंतर कापू शकणार आहे.
सध्याला इलेक्ट्रिक दुचाकींच्या बाजारामध्ये बजाजचा वाटा हा 13 टक्के इतका आहे. ओला, अॅथर आणि टीव्हीएस यासारख्या कंपन्यांना बजाज टक्कर देत आहे. ओला कंपनीने अलीकडेच एस 1 एक्स या गाडीची किंमत कमी करत 70 हजार रुपये इतकी केली आहे. अॅथर या कंपनीनेसुद्धा स्कूटरची किंमत 1 लाख 10 हजार रुपये आहे.
बाजारात ‘ओला’च अग्रेसर
इलेक्ट्रिक वाहन निर्माती संघटना एसएमईव्ही यांच्या आकडेवारीनुसार इलेक्ट्रिक दुचाकी बाजारामध्ये बजाजचा वाटा 13 टक्के इतका आहे. अॅथरचा बाजारातील वाटा 8 टक्के असून टीव्हीएसचा बाजारातील वाटा 15 टक्के इतका नोंद आहे. या बाजारामध्ये सध्याला ओला इलेक्ट्रिकने सर्वाधिक 45 टक्के इतका वाटा उचलत आघाडी घेतलेली आहे.