बजाज ऑटो, हिरो मोटो, रॉयलच्या दुचाकी विक्रीत घसरण
मुंबई :
गेल्या नोव्हेंबर महिन्यात देशातील दुचाकी विक्री काहीशी प्रभावीत राहिली असल्याचे दिसून आले आहे. ऑक्टोबरमध्ये उत्सवी हंगामामुळे दुचाकी विक्री समाधानकारक राहिली होती.
ऑक्टोबरमध्ये घाऊक दुचाकी विक्री 14 टक्के वाढीव राहिली होती तर किरकोळ विक्री 36 टक्के इतकी वाढली होती. आघाडीवरची दुचाकी निर्माती कंपनी हिरोमोटो कॉर्प, बजाज ऑटो व रॉयल इनफिल्ड यांच्या देशांतर्गत दुचाकी विक्रीत 4 ते 7 टक्के इतक्या प्रमाणात घसरण झाली आहे. ही घसरण नोव्हेंबर 2023 च्या तुलनेत आहे. हिरोमोटोकॉर्पने नोव्हेंबर 2024 मध्ये 4,39,777 दुचाकींची विक्री केली आहे. नोव्हेंबर 2023 च्या तुलनेत विक्री 7 टक्के कमी दिसून आली. पण निर्यातीत कामगिरी मात्र सरस राहिली असून 36 टक्के इतकी वाढ झाली आहे.
बजाजची, रॉयलची कामगिरी
बजाज ऑटोच्या विक्रीत 7 टक्के घट झाली असून कंपनीने 2,03,611 दुचाकींची विक्री नोव्हेंबर 2024 मध्ये केली आहे. दुसरीकडे कंपनीच्या निर्यातीत मात्र 26 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली आहे. रॉयल इनफिल्डची विक्री 4 टक्के कमी राहिली असून नोव्हेंबरमध्ये 72,236 इतक्या दुचाकींची विक्री कंपनीने केली आहे. असं जरी असलं तरी कंपनीने निर्यातीत लक्षणीय कामगिरी केली आहे. नोव्हेंबरची कंपीनीची निर्यात 96 टक्के वाढलेली आहे. कंपनीच्या प्रिमीयम प्रकारातील दुचाकींना विदेशात चांगला प्रतिसाद लाभतो आहे, हेच निर्यातवाढीवरुन म्हणता येईल.
टीव्हीएसच्या विक्रीत वाढ
दुचाकी कंपनी टीव्हीएसच्या दुचाकी विक्रीत मात्र 6 टक्के वाढ झाली असून 3,05,323 इतक्या वाहनांची विक्री झाली आहे. यामध्ये स्कूटरचा विक्रीतील वाटा 22 टक्के असून उर्वरीत 57 टक्के इतकी वाढ इलेक्ट्रीक दुचाकी विक्रीतून दिसून आली आहे.
एकंदर यावर्षी पाहता एप्रिल ते नोव्हेंबर हा काळ दुचाकी विक्रीसाठी उत्सवामुळे चांगला गेला आहे. ऑक्टोबरमध्ये विविध उत्सवांमुळे दुचाकींची विक्रमी स्तरावर विक्री दिसून आली. 3 ते 13 नोव्हेंबर या दरम्यान किरकोळ दुचाकी विक्री उत्सवीकाळात 13 टक्के वाढत 33,11,325 इतकी दिसून आली.