For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वैशाख...... चैत्रसखा

06:40 AM May 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
वैशाख       चैत्रसखा
Advertisement

दररोज दूरवर वारा, वळीवाने सचैल भिजतो, वैशाख असा घन भरला, सृष्टीला क्वचितच दिसतो,

Advertisement

तीव्रता उन्हाची उतरे, शितलता भवती भासे, मधुनचि सावळी छाया पोळत्या भुईला गवसे,

या पानगळीच्या संगे, त्यागाचे सुंदर उत्सव, डोईवर पदर उन्हाचे,

Advertisement

जणू आकाशाचे वास्तव, नवचैतन्याच्या वाटा,

या फांदी मधुनी रुजती, शिशिराला ठाऊक असते,

या पानगळीची महती...

भारतातले ऋतुचक्र पाहिले तर लक्षात येतं की एका ऋतूचा मुक्काम साधारण दोन महिन्यांचा असतो. तो आधीच्या महिन्यातूनच येण्याची सुरुवात करतो आणि जातानाही तो पुढच्या एक दोन महिन्यांमध्ये रेंगाळत बसतो. या दोन महिन्यात येणाऱ्या आणि जाणाऱ्या ऋतूंचा विरोधाभास मात्र अगदी जाणवणे इतपत मोठा असतो. चैत्रातील नवीन पालवी आणि मोहर जरी सुखावून जात असली तरी हवेतला उकाडा वैशाखाची चाहूल देतोच. म्हणजेच नवीन पालवीच्या जगण्याचा प्रवास दाहकतेतून जाणारच आहे, याची खात्री पटते. प्रत्येक पानाला जीवनाभिमुख करणारा वैशाख खरं तर चैत्राचा सखा म्हणावा लागेल. पण आपण मात्र वैशाख वणव्याचे स्मरण जास्त करत राहतो. दिवस मोठा असणारा वैशाख दाहक जरी असला तरी आपल्याला खऱ्या अर्थाने तो जागृत ठेवणारा असतो. मनाची अस्वस्थता, व्याकुळता सहजपणे तरल करून जाणारा हा महिना. या महिन्यातले सुगंधी वारे सगळ्यांच्या मनाला भावतात. कुठून तरी येणाऱ्या मोगऱ्याचा गंध उन्हाची तलखी हळुवार करून जातो. मोगरा दिसला नाही तरी त्याचे अस्तित्व मनाला मोहरून ठेवतात. खरंतर चैत्रात वसंत वैभव पाहताना डोळे तृप्त झालेले असतात पण जाता जाता वैशाखात मात्र नाकाला सुगंधाचे वेध लागतात. मन भरून टाकणारा किंवा छाती भरून घ्यावा असा सुगंध म्हणजे नेमकं काय ते ह्या महिन्यात अनुभवायला येतं. ऐन उन्हात सुद्धा चाफ्याचा मंद सुगंध मनाला साद घालत राहतो. याचं सुंदर उदाहरण ज्ञानदेवांनी देखील दिलेय.... वसंताचं वर्णन करतांना ते लिहितात.

ना तरी उद्याने माधवी घडे, ते वन शोभेची खाणी उघडे

सूर्य तापदायक असला तरी तो वनश्रीचे भांडार उघडणारा ठरतो. तलखी कमी होईल म्हणून आपण त्याची वाट पाहतो पण खरंतर या महिन्यातला चंद्रच आपली वाट पहात घराच्या बाहेर उभा असतो. या सगळ्यात आपल्याला मुलायम स्पर्शाने हळुवार स्पर्श करणारे शिरीशाची फुले मात्र अगदी फुलून आलेली असतात. दाहक उन्हातले हे तरल कोमलता म्हणजे द्वंद्वात्मक विश्वाचा भाग वाटतो. अशा या वैशाखातच जगण्याचं भान देणाऱ्या गौतम बुद्धांचा जन्म झाला. पांढऱ्याशुभ्र कळ्यांनी लगडलेले मदन बाणाचे झाड, मोगरा, जाई, जुई म्हणजे उन्हाचे रंग लेवून फुलणारी ही फुलझाडं जादूच्या सुगंधाने फुलत राहतात.

वैशाखाला आपल्या पदरात बांधून घेणारे काळे मेघ म्हणजे तुमच्या आमच्यासाठी पावसाची सोय करणारे देवदूत. आम्हाला पाणी देतात पण पदरात मात्र निखारे बांधतात. अशा या वातावरणात बहावा मात्र फुलांचे हार होऊन गजरे करून आपल्या फांद्यांना लावून ठेवतो. एखाद्या फुलवाल्याच्या दुकानासारखा तो दिसतो. त्याला नुसतं बघण्याने सुद्धा किती आनंद वाटतो आणि मनामध्ये हळुवारपणा जाणवत राहतो. पण माणसापेक्षा हा बहावा मातीशी जास्त जवळीक साधतो. याचं वर्णन एका काव्यात फार सुंदर केले आहे .......

ती आर्त तृष्णा वेळा तापल्या सूर्यमाला.... चैत्रातल्या सकाळी लोंबला घोस पिवळा

निष्पर्ण तीच फांदी पिवळून अंगकांती

जणू हळद खेळण्याला हा कोण येईल कुठला?

तो दुत पावसाचा,

देत असे एक सांगावा

वळवा सवे निघाल्या, जलमेघ शांतवाया, चैत्रातल्या क्षणांना,

झुंबरे भेट द्याया,

बहकत्या उष्णतेला,

तो लाभतो बहावा,

या बहाव्याशी स्पर्धा करणारं एकमेव गावठी झाड म्हणजे बाभळी, सोनसावर त्याला हळदीसारखा वास येतो. उघडं बोडकं माळरान सुद्धा या फुलांनी अगदी सजून जातं. गुलबक्षी आणि चाफा म्हणजे वैशाखाची प्रेमळ भेट. उन्हातच उमलण्याचे भाग्य त्यांना लाभतं. अशा या फुलांच्या महोत्सवाला आवर्जून उपस्थिती लावणारे फुलपाखरं आणि भुंगे मधाची मेजवानी करूनच परतीच्या वाटेवर निघतात. सर्वत्र पक्षांचा चिवचिवाट एकदम वाढला की काय! असंही वाटून जातं. या सगळ्या गडबडीत कावळा मात्र आपलं वेडवाकडं घरटं बांधत असतो. कोकिळेचा गाण्याचा सराव सुरू होऊन तो अगदी टिपेला पोहोचतो. उन्हाचा दाह किंवा वणवा हा दोष बाजूला ठेवला तर वैशाख म्हणजे सुगंधाचे दूत चारही दिशांना पाठवणारा ठरतो. पिवळ्या जर्द फुलांबरोबर लालभडक फुलांनाही अंगा खांद्यावर मिरवणारा महिना. शिरीशाच्या फुलांनी पक्षांच्या गालावर गुदगुल्या करत मेकअप करणारा महिना किती विविध प्रकारच्या सौंदर्य आभूषणांनी हसतो, नटतो आणि मिरवतो ही अशावेळी मनात येतं.

‘शिवार अवघे रंग, ऋतूंचा फुलवी सांगावा, जडल्या रानी गळत्या,

पाणी स्वरंग शोधावा. रंग ऋतूंच्या दिवसांची ही रंगीतशी माया

रंग माखल्या देहा देई, रंगीत पडछाया....

?  सौ. अद्वैता उमराणीकर

Advertisement
Tags :

.