For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बैलूर महालक्ष्मीदेवी यात्रोत्सवाला प्रारंभ

12:09 PM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
बैलूर महालक्ष्मीदेवी यात्रोत्सवाला प्रारंभ
Advertisement

बैलूर, बाकनूर, मोरब, देवाचीहट्टीची यात्रा : पारंपरिक वाद्ये-भंडाऱ्याच्या उधळणीत मिरवणूक : महालक्ष्मी देवीचा जयघोष

Advertisement

वार्ताहर/किणये

बैलूर, बाकनूर, मोरब, देवाचीहट्टी या चार गावांतील जागृत श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला बुधवार दि. 6 पासून मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. तब्बल 15 वर्षांनंतर यात्रा भरविण्यात आल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पारंपरिक वाद्यांचा गजर व भंडाऱ्याच्या उधळणीत देवीची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. देवीच्या विवाह सोहळ्याला हजारो नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी श्री महालक्ष्मी देवीचा जयघोष करण्यात आला. खानापूर तालुक्याच्या व बेळगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या बैलूर, बाकनूर, मोरब व देवाचीहट्टी या चार गावांमध्ये बुधवारी श्री महालक्ष्मी देवीच्या जयघोषामुळे अवघा परिसर दुमदुमला होता. महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाच्या प्रारंभामुळे नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. बुधवारी पहाटे महालक्ष्मी देवीची हक्कदारांच्यावतीने पूजा करून सकाळी 10.30 वाजता विवाह सोहळा संपन्न झाला. दुपारी 2 वाजता महालक्ष्मी देवी गदगेवर विराजमान झाली.

Advertisement

बैलूर येथील निसर्गरम्य परिसरात पावणाई देवी मंदिराच्या बाजूला शेड उभारून महालक्ष्मी देवीची मूर्ती बनविण्यात आली. सुमारे आठ फूट उंचीची ही मूर्ती चिखलापासून बनविली आहे. मूर्ती आकर्षक व सुंदर बनविण्यात आल्यामुळे देवीचे दर्शन घेताना भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटत आहे. बुधवारी पहाटे बाकनूर ग्रामस्थांच्या हस्ते प्रारंभी देवीची नजर काढून भोमनदार व आमदार हलगेकरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर गाऱ्हाणा घालून सकाळी 6.30 वाजता उपस्थित हक्कदार करणसिंग सरदेसाई, धनश्री सरदेसाई, आमदार विठ्ठल हलगेकर, यात्रा कमिटी व पंच कमिटीच्या उपस्थितीत परंपरेनुसार अक्षतारोपण करण्यात आले. त्यानंतर श्री महालक्ष्मी देवी लाकडी गाड्यावर विराजमान झाली. गावच्या दिशेने देवीला आणण्यात आले. पावणाई देवी मंदिर येथून बिरजे गल्लीतून गुरव गल्ली येथील चाळोबा मंदिरसमोर देवीची मूर्ती आणण्यात आली. त्या ठिकाणी भोमणदारांच्या हस्ते देवीची ओटी भरण्यात आली. त्यानंतर पुन्हा श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती विवाह सोहळ्याच्या ठिकाणी नेण्यात आली. सकाळी ठीक 10.30 वाजता श्री महालक्ष्मी देवीचा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी हजारो भक्तांची गर्दी दिसून आली. पुजारी व पुरोहितांनी मंगलाष्टके म्हटल्यानंतर सर्वांनी अक्षतारोपण केले.

मिरवणुकीत तरुणाईचा उत्साह

विवाह सोहळ्यानंतर पारंपरिक वाद्यांचा गजर सुरू झाला. भंडाऱ्याची उधळण करत महालक्ष्मी देवीच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीत चारही गावांतील नागरिक, तरुणवर्ग व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बैलूरवाडा, आंबेडकर गल्ली, सिद्धनाथ मंदिर परिसरात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत पिरनवाडी येथील कुरबर बांधवांनी पारंपरिक वाद्यांचा गजर केला, तसेच ढोल-ताशाच्या तालावर तरुणाई थिरकत होती. भंडाऱ्याची उधळण करत भाविकांकडून महालक्ष्मी देवीचा जयघोष करण्यात येत होता. ही महालक्ष्मी देवी केवळ लाकडाच्या गाड्यावर विराजमान होती. त्यामुळे देवी खेळविताना भाविकांमध्ये उत्साह दिसून आला.

चार गावांच्या मिळून होत असलेल्या यात्रेसाठी भव्य व आकर्षक शामियाना उभारण्यात आला आहे.दुपारी 2 वाजता देवी गदगेवर विराजमान झाली. त्यानंतर दुपारी 4 वाजता धार्मिक विधी करण्यात आले. यावेळी हक्कदार, महालक्ष्मी देवी यात्रा कमिटीचे अध्यक्ष, सर्व सदस्य, आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील आदी उपस्थित होते. सर्वांनी यात्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे महालक्ष्मी देवी यात्रा कमिटीच्यावतीने कळविण्यात आले आहे.

सांस्कृतिक, धार्मिक-मनोरंजनाचे कार्यक्रम

यात्रोत्सवानिमित्त विविध प्रकारची खेळणी, आइक्रीम आदी स्टॉल मांडले आहेत. ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी चारही गावांतील ग्रामस्थ व यात्रा कमिटी यांच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे. दि. 14 पर्यंत यात्रा सुरू राहणार असून यात्रोत्सवाच्या काळात विविध सांस्कृतिक, धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

Advertisement
Tags :

.