मिडकनट्टीतील चोरी प्रकरणात बैलहोंगलच्या जोडगोळीला अटक
महिनाभरापूर्वी 150 ग्रॅम सोन्यावर मारला होता डल्ला
प्रतिनिधी/ बेळगाव
मिडकनट्टी (ता. गोकाक) येथे एक महिन्यापूर्वी झालेल्या घरफोडी प्रकरणी बैलहोंगल तालुक्यातील एका जोडगोळीला अटक करून त्यांच्याजवळून सुमारे साडेसात लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. गोकाक ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
रामचंद्र ऊर्फ रामसिद्ध फकिराप्पा तळवार (वय 19) राहणार मोहरे, ता. बैलहोंगल, नागराज शिवलिंग मॅगेरी (वय 21) राहणार कोळ्यानट्टी, ता. बैलहोंगल अशी त्यांची नावे आहेत. रामचंद्र हा व्यवसायाने कारचालक असून नागराज हा गवंडी काम करतो. मुद्देमालासह पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली गोकाकचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक, गोकाकचे पोलीस निरीक्षक सुरेशबाबू आर. बी., गोकाक ग्रामीणचे उपनिरीक्षक किरण मोहिते, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती एल. एस. पत्तेन्नावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तांत्रिक विभागाच्या मदतीने या दोघा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
29 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 यावेळेत मिडकनट्टी येथील महादेव पंडाप्पा संसुद्धी यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून 150 ग्रॅम सोन्याचे दागिने तिजोरीतून पळविले होते. 9 लाख 75 हजार रुपये किमतीचे दागिने, 20 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण सुमारे 10 लाख रुपयांचा ऐवज पळविला होता.
पोलिसांनी त्यांच्याजवळून एक सोन्याची चेन, पाटल्या असे 5 लाख 20 हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत. चोरीच्या सोन्याची विक्री करून त्यांनी स्विफ्ट कार खरेदी केली होती. सुमारे दीड लाख रुपये किमतीची कार पोलिसांनी जप्त केली आहे. चोरीसाठी वापरण्यात आलेली हिरो एचएफ मोटारसायकल, दोन मोबाईल असा एकूण 7 लाख 30 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.