‘आप’च्या अमित पालेकर यांचा जामीन रद्द, अटकेची शक्यता
फ्रान्समध्ये जाण्याच्या परवानगीवर गेले अन्य चार देशांत
पणजी : बाणस्तारी येथे भीषण अपघातप्रकरणी संशयित आरोपी असलेले आम आदमी पार्टीचे (आप) अमित पालेकर यांना दिलेला जामीन रद्द करण्याचा फोंडा येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आदेश सोमवारी जारी केला आहे. यामुळे आपला आणि पालेकरांना जोरदार धक्का बसला असून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. पालेकर यांनी फ्रान्स देशात जाण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागितली असता, त्यांनी अन्य चार देशांतही पर्यटन केल्याने न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचा भंग झाला असल्याचे म्हणणे पोलिसांनी न्यायालयात मांडले.
पालेकरांचे वकील नितीन सरदेसाई यांनी पोलिसांचा हा दावा हास्यास्पद असून न्यायालयाचा आदेश परवानगीशिवाय पालेकरांनी विदेशात जाऊ नये, असा असल्याचे मत मांडले होते. पालेकरांच्या वकिलांचा दावा अमान्य करून सरकारी वकिलांनी पालेकर यांनी फक्त फ्रान्स या एकाच देशाची विदेशी वारी करण्यासाठी परवानगी घेतली, आणि प्रत्यक्षात आणखी चार देशातही पर्यटन केल्याने न्यायालयाच्या आदेशाचे पालन झाले नाही. न्यायालयाचा आदेश हा सरसकट अनेक देशांसाठी लागू होत नसल्याचे फोंडा न्यायालयाने मान्य केले असल्याचे त्यांनी नमूद केले. अॅड. राजाराम देसाई यांनी सरकारची बाजू मांडली.