For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जेएनयू प्रकरणातील सर्वांना जामीन मंजूर

06:42 AM Feb 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
जेएनयू प्रकरणातील सर्वांना जामीन मंजूर
Advertisement

आंदोलनातील गोंधळानंतर झाली होती अटक

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेने गुरुवारी दिल्लीत आयोजित केलेल्या मोर्चादरम्यान पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये जोरदार गोंधळ झाला होता. या संघर्षात 25 पोलीस अधिकारी जखमी झाले होते. निदर्शकांनी सुरक्षा दलावर हल्ला केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. तर पोलीस खात्याने बळाचा वापर करत मोर्चा चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. या घटनेनंतर पोलिसांनी 51 निदर्शकांना ताब्यात घेतले, त्यापैकी 14 जणांना औपचारिकरित्या अटक केली होती. तथापि, जेएनयू घटनेत दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने सर्व 14 निदर्शक विद्यार्थ्यांना 25,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

Advertisement

आंदोलनादरम्यान जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स तोडले, काठ्या, बॅनर आणि बूट फेकले आणि अनेक पोलिसांवर हल्ला केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. परिस्थिती चिघळताच पोलिसांनी उत्तर गेटवर निदर्शकांना थांबवत त्यांना कॅम्पसमध्ये परत ढकलले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी पोलीस अधिकाऱ्याला चापट मारत असताना आणि दुसरा विद्यार्थी सुरक्षा दलांवर लाठीमार करताना दिसत आहे.

आंदोलक विद्यार्थ्यांचा पोलिसांवर आरोप

जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या निषेध मोर्चादरम्यान पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये जोरदार चकमक झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.पोलिसांनी अनावश्यक लाठीमार केल्याचा आरोप अटक केलेल्या विद्यार्थ्यांनी केला आहे. पोलिसांच्या अटकावामुळे अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. काहींना ‘अज्ञात ठिकाणी’ नेण्यात आल्याचा दावाही विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. यासंबंधी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिक्षक संघटनेने (जेएनयूटीए) एक निवेदन जारी करत पोलिसांचा बळाचा वापर निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे. पोलिसांची ही कृती विद्यार्थ्यांना त्यांचा लोकशाही अधिकार, मोर्चा काढण्याचा अधिकार वापरण्यापासून रोखण्यासाठी होती असा युनियनचा आरोप आहे.

Advertisement
Tags :

.