Kolhapur News : टीईटी पेपरफोडी प्रकरणातील 17 आरोपींचे फेटाळले जामीन अर्ज
पेपरफुटीप्रकरणी गायकवाड व हंचनाळे यांची पोलीस कोठडी वाढली
कोल्हापूर : शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर फोडणाऱ्या रॅकेटमधील १७जणांचा जामीन अर्ज शनिवारी कागल न्यायालयाने फेटाळला. मुख्य सूत्रधार संदीप भगवान गायकवाड आणि महेश भगवान गायकवाड (दोघे रा. बेलवाडी, ता. कराड, जि.सातारा) यांच्या पोलीस कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ झाली. पाटण्यातील पाच जणांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक बिहारला रवाना झाले आहे.
टीईटी परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करुन कोल्हापूर पोलिसांनी २६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत मुख्य सूत्रधार महेश भगवान गायकवाड (वय ४० रा. कराड) याच्यासह त्याच्या भावाकडून महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. गायकवाड बंधूंना प्रश्नपत्रिका पाटणा येथून मिळाल्याची माहिती समोर आली. पाटणा येथील रितेशकुमार, महंमद, सलाम, आणी ललितकुमार यांच्यासह आणखीन एकाचा समावेश या प्रकरणात समोर आला आहे. त्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक बिहारमध्ये पोहोचले आहे. पटना आणि परिसरात त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गायकवाड, हंचनाळे यांच्या पोलीस कोठडीत वाढ
पेपरफुटीप्रकरणी अटकेत असलेल्या महेश गायकवाड आणि अनिल हंचनाळे या दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्यांना शनिवारी (दि. २९) कागल येथील न्यायालयात हजर करण्यात आले. या गुन्ह्याच्या तपासाची व्याप्ती वाढत असल्याने पोलिसांनी दोन्ही आरोपींची कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी सरकार पक्षाच्यावतीने करण्यात आली. त्यानुसार न्यायाधीशांनी आणखी तीन दिवसांची कोठडी वाढवली.
१७ जणांचे जामीन फेटाळले
रोहीत सावंत, अभिजीत पाटील, संदीप गायकवाड, अमोल जरग, स्वप्निल पोवार, रणधीर शेवाळे, तेजस मुळीक, प्रणय सुतार, संदीप चव्हाण, श्रीकांत चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, गुरुनाथ चौगले, अक्षय कुंभार, किरण बरकाळे, नागेश शेंडगे, राहूल पाटील, दयानंद साळवी यांचे जामीन अर्ज न्यायालयाने शनिवारी फेटाळले.
परीक्षा परिषदेकडून माहिती मिळणार
गोपनीयतेचा भंग होणार नाही याची खबरदारी घेऊन तपासासाठी आवश्यक असलेली माहिती देण्यास परीक्षा परिषदेने सहमती दर्शवली आहे. दोन दिवसांत माहिती प्राप्त होईल. त्यानुसार पुढील तपास केला जाईल, असे तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांनी सांगितले.