बहिरेश्वरच्या श्रीकृष्ण तलावाचे रुपडे पालटणार! लोकसहभागातून गाळ काढण्याचे काम सुरू
शासन स्तरावरून निधी मिळण्याची गरज
सांगरूळ वार्ताहर
करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथील पांडवकालीन ऐतिहासिक व धार्मिक परंपरा असलेल्या श्रीकृष्ण मंदिरच्या गाव तलावातील गाळ काढण्याचे काम लोकसहभागातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू केले आहे. या कामासाठी मोठ्या निधीची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या गाळमुक्त तळे या योजनेतून हे काम पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालून या ऐतिहासिक व धार्मिक स्थळाच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे .
बहिरेश्वरच्या गाव तलावात मधोमध श्रीकृष्ण मंदिर आहे .हे मंदिर पुरातन व पांडवकालीन आहे .करवीर महात्म्य ग्रंथात या तलावाचा आणि मंदीराचा उल्लेख आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात चौथ्या सोमवारी येथे मोठी यात्रा भरते . या तलावात केंदाळ वाढले होते. मागील वर्षी गावातीलच पठार किंग तरुण मंडळाच्या वतीने राजेंद्र सूर्यवंशी यांच्या सहकार्यातून तळ्यातील केंदाळ काढण्याचे काम केले होते . तर यावर्षी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून तळ्यातील गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. साधारण वीस फूट इतके गाळाने तळे भरले आहे. हा गाळ काढण्यासाठी एक पोकलँड आणि ५० ट्रॅक्टर काम करत असून दहा दिवसात ७ हजार घनमीटर म्हणजेच दोन हजार ट्राॅल्या गाळ बाहेर काढला असून अजूनही गाळ काढण्याचे पन्नास टक्के काम बाकी आहे, यासाठी मोठ्या निधीची गरज असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलसंधारण विभागातून गाळमुक्त तळे आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत या कामासाठी निधी मिळवून देण्यासाठी पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी प्रयत्न करत आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात ग्रामपंचायतच्या फंडातून हे काम सुरू आहे. या तळ्याच्या सुशोभीकरणासाठी कोट्यावधी रुपयांच्या निधीची गरज असून लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष लक्ष घालून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थातून होत आहेनिधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे
लोकसहभागाला शासनाकडून बळ मिळावे
बहिरेश्वर गावचा ऐतिहासिक व धार्मिक वारसा सांगणारा हा श्रीकृष्ण तलाव आणि श्रीकृष्ण मंदिर आहे. पौराणिक स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेले हे मंदीर आहे. अत्यंत रेखीव आणि आधुनिक तंत्रज्ञानाला ही मागे टाकणारी रचना असलेल्या मंदीराचे बांधकाम जांभ्या दगडात केले आहे. त्याचे संवर्धन करण्यासाठी ग्रामपंचायत आणि बहिरेश्वर ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत .मंदिर व तलावाच्या शिष्यीविकरणासाठी शासन स्तरावरून निधी उपलब्ध व्हावा
वंदना निवृत्ती दिंडे
लोकनियुक्त सरपंच