बागान-बेंगळूरमध्ये आज जेतेपदासाठी लढत
वृत्तसंस्था/ कोलकाता
2025 च्या इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) शनिवारी येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणाच्या मैदानावर मोहन बागान आणि बेंगळूर एफसी यांच्यात जेतेपदासाठी अंतिम लढत खेळवली जाणार आहे. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा अपेक्षित आहे.
मोहन बागान संघाने अलिकडेच लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळविले असून आता ते आयएसएल चषकावर आपले नाव कोरण्यासाठी सज्ज झाले आहेत. मोहन बागान संघाला जोस मोलिना यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे. बेंगळूर संघाचे नेतृत्व गुरुप्रितसिंग संधूकडे सोपविण्यात आले आहे. गेल्या वर्षी मोहन बागान संघाला या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. पण यावर्षी बागानच्या खेळाडूंनी आपल्या कामगिरीत सातत्य राखत लीग स्पर्धा जिंकली. बेंगळूर एफसी संघाला गेरार्द झेरागोझा यांचे मार्गदर्शन लाभत आहे. बागानचे नेतृत्व सुभाशिष बोस करीत आहे. मोहन बागान संघाने लीग शिल्ड स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करत विजेतेपद मिळविले होते. तर बेंगळूर एफसीला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. बेंगळूर एफसी संघातील खेळाडूनी आयएसएल स्पर्धेतील गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केल्याने शनिवारच्या अंतिम सामन्यात बागानला त्यांच्याकडून शेवटपर्यंत कडवा प्रतिकार होईल असा अंदाज आहे. ही अंतिम लढत घरच्या मैदानावर होत असल्याने बागानला स्थानिक शौकिनांचा प्रतिसाद अधिक मिळेल. 2022-23 च्या आयएसएल स्पर्धेत बागान आणि बेंगळूर यांच्यात अंतिम सामना खेळवला गेला होता. आणि कोलकात्याच्या बागान संघाने पेनल्टीमध्ये हा सामना जिंकला.