फिनलँडमध्ये बॅडमिंटन स्पर्धा आजपासून
वृत्तसंस्था / व्हेनेटा (फिनलँड)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या आक्&िटक खुल्या सुपर 500 पुरुष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवारी येथे प्रारंभ होत आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर भारताचे पी.व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेनंतर पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांची ही पहिलीच स्पर्धा आहे. भारताच्या या दोन्ही बॅडमिंटनपटूंनी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत साफ निराशा केली. पी. व्ही. सिंधूला आता अनुप श्रीधर आणि कोरियाचा सेयुन हे नवे प्रशिक्षक मार्गदर्शन करीत आहेत. लक्ष्य सेनचे पॅरिस ऑलिम्पिकमधील पदक थोडक्यात हुकले. फिनर्लंडमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचा पहिल्या फेरीतील सामना कॅनडाच्या मिचेली लीबरोबर तर लक्ष्य सेनचा सलामीचा सामना डेन्मार्कच्या रासमूस गेम्केबरोबर होणार आहे. सिंधूने पहिल्या फेरीतील सामना जिंकल्यास तिची पुढील फेरीत गाठ जपानच्या 18 वर्षीय मियाझाकीबरोबर पडू शकेल. मियाझाकी ही 2022 सालातील कनिष्ठ विश्व बॅडमिंटन स्पर्धेतील विजेती आहे. या स्पर्धेमध्ये भारतातर्फे किदांबी श्रीकांत, किरण जॉर्ज, सतीशकुमार करुणाकरन त्याचप्रमाणे मालविका बनसोड, आकर्षी कश्यप, रितुपर्णा पांडा आणि स्वेतपर्णा पांडा या भगिनी महिला दुहेरीत भारताचे प्रतिनिधीत्व करतील.