गृहखातं कोणत्या दिशेला जात आहे हे सत्ताधाऱ्यांनी पहाणे गरजेचं...राज्याला नविन सरकार देण्यास महाविकास 'कमिटेड'- सतेज पाटील
बदलापूरच्या घटनेमधील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी तमाम महाराष्ट्राची इच्छा होती मात्र कोणाला तरी वाचवण्यासाठी त्याचा एन्काउंटर करण्यात आला की काय अशी शंका काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली. तसेच या घटनेनंतर मुख्यमंत्री ज्या पद्धतीने बोलत आहेत हे संयुक्तीक नसून महाराष्ट्राचे गृहखाते कोणत्या दिशेला जात आहे ते पहाण्याची सत्ताधाऱ्यांना गरज असल्याचेही आमदार सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.
बदलापूर लैंगिक अत्याचारातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे यांचा काल पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर करण्यात आला. या घटनेनंतर विरोधकांनी विशेषता महाविकास आघाडीच्य़ा नेत्यांनी सरकारवर टिकेची झोड उठवली आहे. कोल्हापूरात माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पोलिसांच्या कारवाईवर शंका उपस्थित करताना गृहमंत्रालयावर ताशेरे ओढले.
ते म्हणाले, "बदलापूरच्या आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी अशी महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा होती. मात्र त्या शाळेचा संस्थाचालक आपटे याला वाचवण्यासाठी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला कि काय अशी शंका व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने बोलत आहेत ते संयुक्तीक नाही. आरोपीला सांभाळू शकत नाही आणि योग्यरीत्या खबरदारी घेऊ शकत नाही ही गृह खात्याची नामुष्की आहे. त्यामुळे राज्याचं गृहखात कोणत्या दिशेला जात आहे हे सत्ताधाऱ्यांनी पहाणे गरजेचं आहे." असं त्यांनी म्हटले आहे.
फडणवीस राजीनामा का देत नाहीत ?
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतरवली सराटी येथील घटना तसेच बदलापूर येथील घटनेनंतर राजीनामा देण अपेक्षित होतं. आज झालेल्या या चकमकीनंतरही देवेंद्र फडणवीस का राजीनामा देत नाहीत. ही घटना घडल्यानंतर डीजीपीनी पत्रकार परिषद घेऊन यांची माहीती द्यायला हवी होती. मात्र गृहमंत्रालयाकडून हे झालं नाही. त्यामुळे गृहमंत्रालयाची वाटचाल तपासली पाहीजे असंही ते म्हणाले.
यापुर्वी अजितदादांच्या पोस्टर कधीही झाकलं नव्हतं
महायुतीच्या अंतर्गत धुसफुसीवर टिका करताना सतेज पाटलांनी हा त्यांचा प्लॅन असल्याचं म्हटलं आहे. भाजपचे लोक अजितदादांवर टीका करत असून बारामतीमध्ये गेल्या 35 वर्षात कधीही अजित दादांच्या पोस्टरवर काळं फडकं लावण्यात आलं नाही पण ते आता घडत आहे. तुम्ही टिका करा आणि आम्ही उत्तर देऊन बाहेर पडतो असा त्यांचा प्लॅन असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच महायुती एकत्र लढो किंवा स्वतंत्र महाराष्ट्राची जनतेने यांना घरी बसवायचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
नविन सरकार देण्यासाठी कमिटेड
कोल्हापूरातील जागावाटपावर माध्यमांनी विचारलं असता कोल्हापुरातील दहाही जागांवर महाविकास आघाडीमध्ये कोणताच वाद होणार नसून जागावाटपामध्ये एकोपा दिसून येईल. आतापर्यत राज्यभरातील दीडशेहून अधिक जागांचे वाटप झालेले येत्या १० तारखेपर्यंत सर्व जागावाटप पुर्ण होईल अशी माहीती देताना महाविकास आघाडी ही राज्याला नविन सरकार देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे.
राज्यातील नेतृत्वाची क्षमता संपल्याने अमित शहांचे दौरे
अमित शहांच्या कोल्हापूर दौऱ्यावर बोलताना राज्यातल्या भाजपच्या नेतृत्वावर पक्षश्रेष्ठींचा विश्वास उडालेला असून राज्यातल्या भाजपच्या नेतृत्वाची क्षमता संपलेली आहे. राज्यातील भाजप एकसंघ ठेवण्यात राज्यातील नेर्तृत्व कमी पडत असल्याने दिल्लीतले आता महाराष्ट्रामध्ये लक्ष घालत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.