खराब रस्ते, युपीएस, कोमुनिदाद निर्णयांबद्दल सरकारचे अभिनंदन
पणजी : गोव्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राची युपीएस पेन्शन योजना लागू करण्याचा तसेच कोमुनिदाद जमिनीचा गौरवापर रोखण्यासाठी चांगला निर्णय घेतल्याबद्दल भाजपने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारचे अभिनंदन केले आहे. भाजपचे प्रवक्ते माजी आमदार दयानंद सोपटे आणि गिरीराज पै वेर्णेकर यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सावंत सरकारवर अभिनंदनाचा वर्षाव केला. ते म्हणाले की, सरकारी कर्मचाऱ्यांना आता किमान ऊ. 10 हजार प्रति महिना निवृत्ती वेतन मिळणार आहे. इतकेच नव्हे तर मृत्यू झाल्यास कुटुंबियांनादेखील निवृत्ती वेतनाची 60 टक्के रक्कम चालू राहणार आहे. यातून सरकारी कर्मचाऱ्यांचे मोठे कल्याण होणार आहे. कोमुनिदाद भूखंडांचा गैरवापर होऊ नये म्हणून सरकारने चांगला उपाय केला असून तो जमीन ऊपांतरास रोखणारा अचूक निर्णय आहे. त्यामुळे कोमुनिदादच्या जमिनी शाबूत राहतील. तसेच त्या ज्या कामासाठी दिल्या आहेत त्याच कामासाठी वापरल्या जातील, असेही त्यांनी नमूद केले. खराब रस्ताप्रकरणी बांधकाम खात्याचे अभियंते, कंत्राटदारांना कोणीच यापूर्वी हलवले नव्हते. आता मुख्यमंत्र्यांनी कडक पवित्रा घेऊन त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारल्याने ते वळणावर येतील आणि चांगले रस्ते देतील आणि जनतेला दिलासा मिळेल, अशी आशा सोपटे व वेर्णेकर यांनी व्यक्त केली.